मोहन देशमुख, इनपूट एडिटर, Tv9 मराठी : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुती सरकारचं गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 21, शिवसेना 13, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 मंत्री अशा एकूण 43 मंत्र्यांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे 17, शिवसेनेचे 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामधील आणखी एक मोठी बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मोठी खाती असणार आहेत. यामध्ये नगरविकास विभाग आणि महसूल विभाग यांचा समावेश आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याबाबत त्यापेक्षा वरचष्मा असणार आहे. कारण त्यांच्याकडे गृह आणि अर्थ ही दोन्ही महत्त्वाची आणि ताकदवान खाती असण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बैठकांचा सिलसिला अखेर पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. ते आज अखेर मुंबईत परतले आहेत. तसेच मुंबईतही भेटीगाठींचं सत्र आज रात्रीपर्यंत सुरुच होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 34 ते 35 मंत्री हे शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
येत्या 14 डिसेंबरला महायुती सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असल्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आणि अर्थ खातं राहणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रिमंडळासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट, आमदार आशिष जैस्वाल यांना नव्याने संधी मिळणार आहे. तर माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.