महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : नांदेडमध्ये दाजी-भाऊजींच्या गटात टफ फाईट; पाहा कोण जिंकले?
आमदार श्यामसुंदर शिंदे हे निवडणुकीपूर्वी खासदार चिखलीकर यांच्या गटात होते. मात्र महाविकास आघाडीची सत्ता येताच त्यांनी गट बदलला. | gram panchyat election results 2021
नांदेड: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालावेळी अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. असाच एक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील हाळदा ग्रामपंचायतीमधील (Gram panchyat election results) दाजी आणि भाऊजींमधील लढत राज्यात चर्चेचा विषय होती. या लढतीत अखेर खासदार प्रताप पाटील-चिखलीकर वरचढ ठरले आहेत. (Nanded gram panchyat election results 2021)
खासदार चिखलीकर यांचे मेहुणे असलेल्या आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हळदा गावात चिखलीकर गटाची सत्ता आली आहे. हाळदा गावात चिखलीकर गटाने सात जागा जिंकत बहुमत मिळवले. तर खासदार चिखलीकर यांनी स्वतःच्या चिखली ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यातही यश मिळवले. प्रताप चिखलीकर यांच्या गटाने कंधार आणि लोहा तालुक्यातही चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे दाजी- भावजीच्या लढाईत खासदार चिखलीकर वरचढ झाल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार श्यामसुंदर शिंदे हे निवडणुकीपूर्वी खासदार चिखलीकर यांच्या गटात होते. मात्र महाविकास आघाडीची सत्ता येताच त्यांनी गट बदलला. तेव्हापासून या दोघांत राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यामुळे हाळदा ग्रामपंचायत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. नांदेड जिल्ह्यात 907 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला असून मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे
माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) आणि संजना जाधव (Sanjana Jadhav) या पती-पत्नीचा दारुण पराभव झाला. औरंगाबादमधील पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या दोघांच्याही पॅनेल्सना पराभवाची धूळ चाखावी लागली. महाविकास आघाडीने हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा धुव्वा उडवला.
पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलला 17 पैकी 4 जागा मिळाल्या, तर संजना जाधव यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने तब्बल 9 जागांवर विजय मिळवला.
जळगावात तृतीयपंथी विजयी
महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे.
या निवडणुकीत राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. अंजली या जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्र. चारमधून उभ्या होत्या. त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. सुरुवातीला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, त्यांनी यशस्वी लढा देत उमेदवार अर्ज दाखल केला आणि त्यापुढे जाऊन त्यांनी निवडणूकही जिंकून दाखवली आहे.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : प्रतिभाताई पाटलांच्या भाचेसूनेचा ईश्वर चिठ्ठीने पराभव
…ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर…, संजय राऊतांचा अग्रलेखातून भाजपला इशारा
जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी
(Nanded gram panchyat election results 2021)