महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, कॅगचा धक्कादायक अहवाल आणि चिंताजनक आकडेवारी
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं समोर आलंय. 2016 ते 2022 या वर्षातील अहवाल सादर करत कॅगने महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर ठपका ठेवलाय.
राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या 8 टक्के निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च होणे अपेक्षित असतानाही राज्यात केवळ 4.91 टक्के निधी खर्च केला जातोय. कॅगने सादर केलेल्या अहवालानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रातील आरोग्य विभाग आजारी असल्याचा टोला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावलाय. कॅगने सादर केलेल्या अहवालातून महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेबाबतची अनास्था उघड झालीय. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागात डॉक्टर, नर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफ पकडून 27 टक्के जागा रिक्त आहेत. राज्याच्या आरोग्य विभागात 27 टक्के डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. 35 टक्के जागा नर्स आणि 31 टक्के जागा या पॅरामेडिकल स्टाफच्या रिक्त आहेत. आयुष महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये 21 टक्के डॉक्टर्स, 57 टक्के परिचारिका आणि निम-वैद्यकीय संवर्गात 55 टक्के पदं रिक्त आहेत.
दरम्यान, सादर केलेल्या अहवालातून कॅगने प्रशासनाला काही निर्देश देखील दिले आहेत. मनुष्यबळ, औषधी द्रव्ये, औषधे, उपकरणांची उपलब्धता आणि आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अभाव आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार राज्यात 1 लाख 25 हजार 411 डॉक्टरांची आवश्यकता आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील पदे तातडीनं भरावीत, लोकसंख्येचा विचार करुन पदवाढ करावी. आरोग्य विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश कॅगने दिले आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिकअधिक सक्षम करण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
36 रुग्णालयांनी अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलंच नाही
महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयात आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सरकारनं काही महत्वाचे निर्देश दिले होते. मात्र, कॅगकडून तपासणी करण्यात आलेल्या अनेक रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव दिसून आला. कॅगने 50 टक्के रुग्णालयांची तपासणी केली, या पैकी 36 रुग्णालयांनी अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं नव्हतं. 22 रुग्णालयांनी धूर-शोधक यंत्र बसविलं नव्हतं. 20 रुग्णालयांनी आगीची सूचना देणारी यंत्रणाच बसवली नव्हती. 21 रुग्णालयांत आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचा मार्गच दाखवण्यात आलेला नव्हता.
कॅगच्या अहवालात आरोग्य विभागावर ताशेरे
अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, पुणे, कोल्हापूर आणि नांदेडमधील रुग्णालयांनी विभागांच्या शिफारशींची पूर्तता केली नव्हती. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटवर असल्याचं दिसून येतंय. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात बेड नसल्यानं शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांवर भर थंडीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली होती. तर बीड, धाराशीव, पुणे, नांदेडमध्ये बोगस औषधांचा पुरवठा करुन रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला होता. आणि आता कॅगनं अहवाल सादर करत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आहेत.