महाराष्ट्र जाती-पातीमध्ये रंगलाय, वाट लागून जाणार राज्याची – राज ठाकरे
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आज कोथरुडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश-बिहार होऊ देऊ नका असं आवाहन केलं. राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु आहे. जे आरक्षणाची मागणी करत आहेत. पण आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणासाठी पाहिजे. पण सरकार नोकऱ्या आणि सरकार शिक्षण संस्था राहिल्याच कुठेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, ‘निवडून येण्यासाठी जात वापरतात. निवडून आल्यानंतर दुसऱ्या जातीकडे बघतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयवादी गोष्टी व्हायला लागले. महापुरुष आम्ही वाटून टाकले. हे आपण वाचत आलो. कशासाठी आपण शिवतोय प्रतिज्ञा. महाराष्ट्रात काय सुरु आहे. निवडणुका झाल्या की यांची दुकाने बंद होतील पण तुमच्यातील भांडण कधीत कमी होणार नाही. एकत्र जेवणारे मित्र आता जाती पाहायला लागले. नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी मागण्या आरक्षण मागतोय. पण सरकारी नोकऱ्या आता संपल्या आहेत. मग कुठलं आरक्षण. सरकार शिक्षण संस्था किती उरल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेत आरक्षण नाही. एकदा कधी विचार करुन बघा. ही लोकं नुसती आग लावत आहेत. निवडणुका संपल्या की सगळं बंद होऊन जाईल. मुळ प्रश्न कोणते आहेत. आपला तालुका सोडून लोकं मुंबई-पुण्याला येताय आणि इथली मुलं परदेशात जाताय.’
राज ठाकरे म्हणाले की, ‘१९५२ सालापासून त्याच मुद्द्यांवर निवडणुका होत आहेत. मग पुढे काय झालं. तुम्ही तरुण आहेत. इंटरनेटवर जग बघत आहेत. जग कुठल्या गोष्टी बोलताय आणि आपण कोणत्या गोष्टी बोलतोय. शहर बर्बाद करुन टाकलीत.’
‘मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला. पण पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. कुठलही टाऊन प्लानिंग नाही. मुंबईचं ब्रिटिशांनी केलेलं टाऊन प्लानिंग बघा. ब्रिटीशांनी असंख्य मैदाना करुन ठेवली. पुण्यात नाट्यगृह किती आहेत. पुण्याची लोकसंख्या किती ६० ते ७० लाखाच्या वर. पुण्यात लोकं बाहेरुन येतायत. सगळं हाताबाहेर गेलं आहे. पण कोणाला काही पडलेलं नाही. २० तारखेला मतदानाला जाल तेव्हा गेल्या पाच वर्षात काय झालंय हे लक्षात ठेवा. तुमच्या मतांचा अपमान झालाय.’
‘सुज्ञ मतदार कसा असतो ते ब्रिटिशांकडून लक्षात येतं. युद्धकाळात चर्चिल हवे होते. पण शांततेच्या काळात नव्हे. सरकार चालवणं वेगळी गोष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धात चर्चिल हवे होते. याला सुज्ञ मतदार म्हणतात. आपल्याकडे जातीचा आहे म्हणून त्याने काहीही केलेलं चालते. असं तर सगळंच बर्बाद होऊन जाईल. महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश-बिहार करायचा आहे का? अनिल शिदोरे उत्तर प्रदेशला गेले होते तेव्हा एका हॉटेलवर थांबले. तेव्हा काऊंटर वरच्या व्यक्तीने त्यांना त्यांची जात विचारली. असा महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे का? जी लोकं एकत्र जेऊ शकत नाही ती एकत्र लढू शकत नाही. आपण कधी हिंदू आणि मराठी म्हणून एकत्र येणार. फक्त दंगलीच्या काळी हिंदू असतो आपण. दुसऱ्या जातीचा द्वेष करु नका.’ असं ही राज ठाकरे म्हणाले.