छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
राज्य सरकारच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे. कुठलाही पुतळा उभारणीआधी कला संचलनालयाची परवानगी घ्यावी लागते. मालवणच्या राजकोट किल्ल्यात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. त्यावरुन सर्वसामान्यांच्या मनात संतापाची भावना आहे. शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडीने या मुद्यावरुन महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मालवणच्या राजकोट किल्ल्याला वेगवेगळे नेते भेट देत आहेत. वाऱ्याचा ताशी वेग 45 किमी असल्याने पुतळा कोसळला, असा सरकारकडून सांगण्यात येतय. निकृष्ट दर्जाच बांधकाम आणि भ्रष्टाचार पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत आहे, असा विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीचा आरोप आहे. एकूणच या मुद्यावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला, त्या संदर्भात आता नवनवीन माहिती समोर येत आहेत. पुतळा उभारणीसाठी कला संचलनालयाची परवानगी आवश्यक असते. आता कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे नेमकं सत्य काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजीव मिश्रा यांनी दिली धक्कादायक माहिती
“कुठली एजन्सी पुतळा उभारणीसाठी प्रस्ताव ठेवते, तेव्हा एजन्सीचा शिल्पकार क्ले मॉडेल तयार करतो. त्यावेळी आमच्यासमोर 6 फुटाच क्ले मॉडल सादर करण्यात आलं होतं. आम्ही मान्यत दिली, त्यावेळी पुतळा 35 फुटाचा असणार, त्यात स्टेलनेस स्टील वापरणार हे सांगितलं नव्हतं. आम्हाला माहिती दिली नव्हती” असा दावा कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी केला आहे.
ठाकरे गट आणि राणे समर्थक भिडले
जयदीप आपटे हा शिवरायांच्या या पुतळ्याचा शिल्पकार असून तो फरार आहे. सरकारकडून या प्रकरणी पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारित होता. काल राजकोट किल्ल्यात ठाकरे गट आणि राणे समर्थक भिडले. खासदार नारायण राणे आणि आदित्य ठाकरे एकाचवेळी किल्ल्यावर पोहोचल्याने हा राडा झाला. दोन्ही बाजूंकडून अत्यंत आक्रमक, राड्याची भाषा झाली.