Maharashtra kesri 2022 : यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, विशाल बनकरला फायनलमध्ये केलं चितपट
यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हा ठरला आहे. त्याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे. मूळचा सोलापूरचा विशाल बनकर विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती. या अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जमा झाले होते. फायनलची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.
सातारा : यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesri 2022) पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) हा ठरला आहे. त्याने विशाल बनकरला फायनलमध्ये चितपट केलं आहे. मूळचा सोलापूरचा विशाल बनकर (Vishal Bankar) विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील अशी ही लढत होती. या अंतिम सामन्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जमा झाले होते. फायनलची ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही साताऱ्यात रंगली होती. या कुस्ती स्पर्धेकडे मोठ्या संख्येने नजरा लागल्या होत्या. यंदाची फायनलची लढत सोलापूर विरुद्ध कोल्हापूर यांच्यात सुरू होती. सुरूवातील विशाल बनकरने आघाडी घेतली होती. मात्र नंतर पृथ्वीराज पाटीलने आघाडी घेत विशाल बनकरला मोठा झटका देत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरच्या नावावर केली आहे.
कोण आहे पृथ्वीराज पाटील?
पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. त्याचे गाव पन्हाळा तालुक्यामधील देवठाणे आहे. पृथ्वीराज पाटील याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे तसेच मोतीबाग तालमीतून कुस्तीची सुरूवात केली आहे. वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटील यांच्याकडून तो कुस्तीचे डावपेच शिकला आहे, त्याचे सध्याचे वजन 95 किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे. एवढेच नाही तर तो आर्मीत हवालदार पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत त्याने कास्य पदकाचीही कमाई केली आहे. आता महाराष्ट्र केसरीसारखी मानाची कुस्ती स्पर्धा जिकल्याने सध्या कुस्ती जगतात त्याचाच बोलबाला आहे.
21 वर्षांनंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा
तब्बल 21 वर्षांनंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली आहे. सोलापूर विरुद्ध कोल्हापुरच्या या सामन्यात शेवटी कोल्हापूर वरचढ ठरलं आहे. त्यामुळे कोल्हापुरातही मोठा जल्लोष सुरू झाल आहे. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी मानली जातं. मात्र गेल्या 21 वर्षापासून मूळचा कोल्हापूरचा असलेल्या एकाही मल्लाही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकता आली नव्हती. त्यामुळे कुस्तीच्या पंढरीला मानाची गदा मिळण्याची प्रतीक्षा लागली होती. यंदा पृथ्वीराज पाटीलने ही प्रतीक्षा संपवत कोल्हापूरकरांच्या चेरहऱ्यावर हसू फुलवलं आहे. कोल्हापूरकर सध्या पृथ्वीराज पाटीलच्या स्वागताची तयारी करत आहेत. कोल्हापुरात त्याची जंगी मिरवणूकही काढली जाण्याची शक्यता आहे.
Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती