Gudi padwa: ढोलताश्यांचा दणदणाट ते शोभायात्रा, राजकीय नेत्यांचा गुढी पाडवा सोहळा जल्लोषात!
कोरोनाचा संकटाचा काळ ओसरला आणि निर्बंधातून सुटका मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्यभरात अत्यंत जल्लोषात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला.
मुंबई: कोरोनाचा (corona) संकटाचा काळ ओसरला आणि निर्बंधातून सुटका मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्यभरात अत्यंत जल्लोषात गुढी पाडव्याचा (gudi padwa) सण उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. ढोलताश्यांचा दणदणाट, रॅली (rally), भगवे फेटे आणि मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. राज्यभरात शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येकजण एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा देताना दिसत होता. यावेळी अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. तर अनेकजण मास्क लावून कोरोना निर्बंधाचे पालन करतानाही दिसत होते. अबालवृद्ध या उत्सवात उत्साहाने सामिल झाले असून स्त्रियांनीही या उत्सावात अत्यंत उत्साहात भाग घेतला आहे. सामान्य जनताच नाही तर राजकीय नेत्यांनीही हा उत्सव दणक्यात साजरा केला आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या नव्या घरी पहिल्यांदाच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी गुढीची विधीवत पूजा केली. यावेळी स्वत: राज ठाकरे, अमित ठाकरे आणि अमित यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. राज आणि अमित ठाकरे यांनीही गुढीला फूलं अर्पण केली. यावेळी राज यांच्या घराबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढी पाडवा साजरा केला. यावेळी अजित पवार यांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुढी पाडव्या निमित्त कोल्हापुरात आले आहेत. त्यांनी कोल्हापूर येथील घरी पत्नीसह गुढीची विधीवत पूजा केली. यावेळी चंद्रकांत पाटील हे पारंपरिक पोषाखात दिसले.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही आज गुढी पाडवा उत्साहात साजरा केला. अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि नवयुवक मंडळाने आयोजित केलेल्या गुढी पाडव्याच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत फुगड्यांचा फेर धरला.
मुंबईच्या काळजीवाहू महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली. कुटुंबीयांसोबत त्यांनी गुढीचं पूजन केलं. त्यानंतर ताडदेव येथील शिवसेना शाखा क्रमांक 215ने आयोजित केलेल्या गुढीपाडवा शोभायात्रेत सहभाग घेतला.
संबंधित बातम्या:
Zodiac | नव वर्षाला या 4 राशींच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संपणार, शनीच्या संक्रमणाने होणार धनलाभ
Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याची मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर