“…म्हणून मी बैठकीला गेलो नाही”, अखेर झिशान सिद्दिकींनी सांगितलं सत्य
काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत एकूण चार आमदार गैरहजर होते. यात संजय जगताप, यशोमती ठाकूर, जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दिकी या आमदारांच्या नावाचा समावेश आहे.
![...म्हणून मी बैठकीला गेलो नाही, अखेर झिशान सिद्दिकींनी सांगितलं सत्य ...म्हणून मी बैठकीला गेलो नाही, अखेर झिशान सिद्दिकींनी सांगितलं सत्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Zeeshan-Siddique.jpg?w=1280)
Maharashtra MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे. या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसवासी बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी हे अनुपस्थितीत होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे. आता यावर झिशान सिद्दिकी यांनी भाष्य केले आहे.
काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत एकूण चार आमदार गैरहजर होते. यात संजय जगताप, यशोमती ठाकूर, जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दिकी या आमदारांच्या नावाचा समावेश आहे. यातील संजय जगताप आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गैरहजेरीबद्दल कळवले होते. पण जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दिकी यांनी वरिष्ठांना गैरहजेरीबद्दल कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. याबद्दल झिशान सिद्दिकी यांना विचारले असता त्यांनी बैठकीचे आमंत्रण नसल्याचे सांगितले.
मला त्यांनी बैठकीसाठी बोलवलं नाही
“जर मला त्यांनी बोलवलंच नाही तर मी कसं जाणार. मला त्यांनी का बोलवलं, मला कोणत्याही बैठकीत सहभागी का करुन घेतलं जात नाही, याचे उत्तर तर तेच देऊ शकतात. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. आजही मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाणार आहे. तिथे जाऊन मी वरिष्ठांशी चर्चा करेन. ते मला ज्यांना मतदान करायला सांगतील त्यांना मी मतदान करेन”, असे झिशान सिद्दिकी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
…तर मी बैठकीला गेलो असतो
“मला त्या बैठकीला न बोलवण्याचे कारण काय होतं आणि इतर गोष्टी हे तेच सांगू शकता. मला कालच्या बैठकीचे कोणतेही आमंत्रण आलेले नाही. कोणत्याही नेत्याने मला फोन करुन बैठकीबद्दल कळवलेलं नाही. मला कोणाचाही फोन, मेसेज, ईमेल आलेला नाही. माझ्याबद्दल जो कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांनी मी सांगू इच्छितो की मला जर काल बोलवले असते तर मी बैठकीला गेलो असतो. मला जर आमंत्रणच मिळाले नसेल तर मी तिथे पोहोचणार कसा? माझी अवस्था तीच झाली होती. मला त्या बैठकीबद्दल काहीही माहिती नव्हती”, असेही त्यांनी म्हटले.
पक्षाचे वरिष्ठ सांगतील त्याचा मी आदर करणार
“मला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ जे सांगतील, त्याचा मी आदर करेन. मी काँग्रेसचा सदस्य आहे, त्यामुळे ते जे सांगतील तसंच मी करणार. मी काल रात्री जेव्हा बातम्या वाचत होतो, तेव्हा झिशान सिद्दीकी अनुपस्थितीत अशी बातमी वाचली. पण जर मला त्यांनी बोलवलं असतं तर मी तिथे गेलो असतो. पण मला बोलवण्यात आले नाही, त्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित राहिलो नाही”, असेही झिशान सिद्दिकी म्हणाले.