Maharashtra political crisis live : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

| Updated on: Jul 08, 2023 | 8:47 AM

Maharashtra political crisis live updates : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होत आहे.

Maharashtra political crisis live : इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाने काल मोठं शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवार यांनीअजित पवार यांच्यासह नऊ जणांची हकालपट्टी केली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jul 2023 06:59 PM (IST)

    भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्या नियुक्त्या

    भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.  राजस्थानचे निवडणूक प्रभारी म्हणून प्रल्हाद जोशी यांची निवड करण्यात आलीये.  छत्तीसगडच्या निवडणूक प्रभारी पदी ओम प्रकाश माथूर यांना संधी मिळाली आहे. प्रकाश जावडेकर यांच्या खांद्यावर तेलांगणाची जबाबदारी देण्यात आलीये. भुपेंद्र यादव यांच्याकडे मध्य प्रदेशच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 07 Jul 2023 06:45 PM (IST)

    इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट

    माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलविलेल्या महत्त्वाच्या बैठकीस सोनाई परिवाराचे माने कुटुंब गैरहजर राहिले आहे. माने कुटुंब शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू निकटवर्तीय आहेत. शहरातील राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक हे बैठकीसाठी गैरहजर होते. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सध्या अजित पवार गटाकडे गेले आहेत.

  • 07 Jul 2023 06:37 PM (IST)

    शरद पवारांनी या गोष्टी करण्यापेक्षा आपण कुठे चुकलो आहोत हे बघितले पाहिजे-हर्षवर्धन जाधव

    शरद पवारांनी या गोष्टी करण्यापेक्षा आपण कुठे चुकलो आहोत हे बघितले पाहिजे. आपल्याला शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामधून बाहेर काढता येईल. पवार साहेबांनी भुजबळांसाठी येण्याऐवजी नाशिकच्या कांद्यासाठी यावे , कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावे. भुजबळांचं काय होतंय शरद पवारांचा काय होते यापेक्षा शेतकऱ्यांच काय होतं हे महत्त्वाचं असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

  • 07 Jul 2023 06:33 PM (IST)

    बालासोर रेल्वे दुर्घटना प्रकरणात सीबीआयने तीन जणांना केली अटक

    बालासोर रेल्वे दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. सीबीआयने तीन जणांना या प्रकरणात अटक केली आहे. रेल्वे खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. अरुण कुमार मोहम्मद खान आणि सोहो पप्पू या टेक्निशियनला अटक करण्यात आलीये. दोन इंजिनिअर आणि एका टेक्निशियनला अटक झाली आहे. रेल्वे सेवेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप यांच्यावर करण्यात आलाय.

  • 07 Jul 2023 06:28 PM (IST)

    शरद पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन मारोतराव पवार यांनी केले

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन येवल्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. भुजबळांचे निकटवर्तीय म्हणून मारोतराव पवार यांच्याकडे बघितले जाते.

  • 07 Jul 2023 06:21 PM (IST)

    राष्ट्रवादीचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पक्षातून बडतर्फ

    राष्ट्रवादीचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ही कारवाई केली गेली आहे.

  • 07 Jul 2023 06:15 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात

    नुकताच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. शेतकरी राजा अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होता पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.  उष्णतेपासून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

  • 07 Jul 2023 06:09 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस अलर्ट मोडवर, थेट दिल्लीत बैठक

    14 तारखेला दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे घेणार आहेत ही बैठक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. थेट दिल्लीत पक्षातील बाबीवर चर्चा होणार आहे. केंद्रीय काँग्रेसने महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. बैठकीत होणार आहे महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा.

  • 07 Jul 2023 06:06 PM (IST)

    बैठक घेण्याचा अधिकार त्यांना नाही- प्रफुल्ल पटेल

    बैठक घेण्याचा अधिकार त्यांना नाही नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.  बैठकीत निर्णय घेण्याचा देखील अधिकार नाहीये. आमच्यावर कुणीही कारवाई करु शकत नाही. कुणीही कुणाला पक्षातून काढू शकत नाही तो अधिकार केवळ निवडणुक आयोगाला आहे, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

  • 07 Jul 2023 05:36 PM (IST)

    दिल्लीत झालेली बैठक अवैध- प्रफुल्ल पटेल

    दिल्लीत घेतलेली बैठक अवैध असून त्यांनी काही नेत्यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचे घेतलेले निर्णय लागू होवू शकत नसल्याचंही पटेल यांनी म्हटलं आहे. आमचे गटाने घेतलेले निर्णय हे अधिकृत असून शरद पवार गटाने घेतलेले निर्णय हे अधिकृत नसल्याचंही पटेल यांनी म्हटलं आहे.

  • 07 Jul 2023 05:31 PM (IST)

    जयंत पाटील अधिकृत प्रदेशाध्यक्ष नाहीत- प्रफुल्ल पटेल

    2022 मध्ये झालेल्या अधिवेशनाला अधिवेशन म्हणता येणार नाही. कारण संविधानानुसार निवडणुका घेणं आवश्यक होतं. मात्र आमच्या पक्षात गेली अनेक वर्षे निवडणूकच झाली नाही. पक्षबांधणी करताना राष्ट्रवादीच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. जयंत पाटील यांनी आमच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. मात्र ते आमचे प्रदेशाध्यक्ष नाहीत. कारण त्यांची नेमणूक अधिकृत नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

  • 07 Jul 2023 05:22 PM (IST)

    अजित पवारांची निवड अध्यक्ष म्हणून झाली- पटेल

    नव्या नियुक्त्यांसाठी निवडणूक आयोगाल अर्ज दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेनुसार सर्व काही सुरू आहे. अजित दादांची निवड अध्यक्ष म्हणून झाली. तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं.

  • 07 Jul 2023 05:16 PM (IST)

    बहुमताने पक्ष अजित पवार यांच्या पाठिशी- प्रफुल्ल पटेल

    राष्ट्रवादी पक्षामध्ये कोणतीही फूट नसून संख्याबळानुसार बहुमताने पक्ष अजित पवार यांच्या पाठिशी आहे. पक्ष म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे चिन्हाची मागणी केल्याचीही माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

  • 07 Jul 2023 05:12 PM (IST)

    अजित पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली- प्रफुल्ल पटेल

    30 जूनला राष्ट्रवादीची बैठक झालेली त्यामध्ये अजित पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं खळबळजनक खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. 30 जूनपासूनच्या घडामोडी निवडणूक आयोगाकडे आहेत, असंही पटेल यांनी सांगितलं.

  • 07 Jul 2023 04:59 PM (IST)

    लातूरात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

    दलित, मुल्सिम, अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज लातूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला लातूर जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले.

  • 07 Jul 2023 04:53 PM (IST)

    जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    चिपळूण, खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे खेडमधील जगबुडी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

  • 07 Jul 2023 04:47 PM (IST)

    मंत्री हसन मुश्रीफ यांचं आज कागलमध्ये शक्ती प्रदर्शन

    कागलच्या गैबी चौकात हसन मुश्रीफ यांचा कार्यकर्त्यांकडून जाहीर सत्कार होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या सभेकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. भाजप नेते समरजित घाटगे यांच्या कालच्या शक्ती प्रदर्शनाला मुश्रीफ काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्याशी फारकत घेतल्यानंतर हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांसमोर काय भूमिका मांडणार याचीही उत्सुकता लागली आहे.

  • 07 Jul 2023 04:46 PM (IST)

    परभणीत रस्त्याच्या कामासाठी माजी नगरसेवकाचं आंदोलन

    रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी भर रस्त्यात सरण रचून माजी नगरसेवकाचं आंदोलन सुरु आहे. सरणावर झोपून आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षी चिखलात झोपून आंदोलन केलं होतं. वर्ष उलटलं मात्र रस्त्याचं काम झालं नसल्याने आंदोलन केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. तर पोलीसही आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.

  • 07 Jul 2023 04:35 PM (IST)

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात विधानसभा प्रमुखांची बैठक सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष संघटना विधानसभा मतदारसंघनिहाय मजबूत करायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात विधानसभा प्रमुखांची बैठक सुरु आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीनंतर शरद पवारांना सगळा अहवाल कळवला जाणार आहे.

  • 07 Jul 2023 04:25 PM (IST)

    राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेण्याचं धाडस करु नका – प्रशांत जगताप

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय ताब्यात घेण्याचं धाडस करू नका, हे कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पैसाही यामध्ये वापरला नाही. शहरातील पदाधिकारी शरद पवारांसोबतचं राहतील. त्यांनी नवीन कार्यालय सुरू करावं. शहरातील 50 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. ते अजूनही संभ्रमात आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल. पक्षाचं चिन्ह आणि पक्ष आमच्याकडेच राहिल, असे प्रशांत जगताप यांनी सांगतिलं.

  • 07 Jul 2023 04:19 PM (IST)

    माझ्यावर टीका केल्यानंतर मी एन्जॉय करते – सुषमा अंधारे

    नीलम गोर्हे यांच्याकडे नाराज होण्याचे कारण नाही. संधी मिळाल्यास ती घेतली पाहिजे, जी आता शिंदे गटात मिळाली आहे. ठाकरे गटाने अनेक संधी दिल्या आहेत. आता त्यांना आरोग्यमंत्री पद मिळणार आहे, ही मोठी संधी आहे. मी फार तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढणारी नेता आहे, म्हणजे त्यांच्या नजरेत सटरफटर असच म्हणावं लागेल. राज्यातील शिवसैनिकांना असं बोलून त्या शिवसैनिकांचा त्या अपमान करत आहेत. त्यांना आरोग्य मंत्री पदासाठी शुभेच्छा. दोन दिवस झाले मी मिम्स बघत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांची इमेज ही लाकूडतोड्या अशी झाली आहे. किती नकारात्मक इमेज तयार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हानात्मक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून त्यांना वेळीच ते आवर घालत आहेत. त्यामुळे त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे.

  • 07 Jul 2023 04:12 PM (IST)

    अक्कलकोटमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा

    अक्कलकोटमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. मृत व्यक्तींना गुन्ह्यात आरोपी करणे तसेच कोर्टाच्या आदेशाविरोधात जमिनीचा ताबा विरुद्ध पक्षाच्या लोकांना दिल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करण्यात आली. कारंजा चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा निघाला. निषेध मोर्चात शेकडो प्रहारचे कार्यकर्ते सामील होते. दरम्यान, या प्रकरणात पोलीस फिर्यादी नसून, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि कर्मचारी फिर्यादी आहेत. यामुळे पोलिसांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसून, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

  • 07 Jul 2023 04:09 PM (IST)

    पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

    अजित पवार उद्या पुण्यात जाणार आहेत. यावेळी पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याआधी खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • 07 Jul 2023 03:35 PM (IST)

    भाजप आमदारांची आज सायंकाळी सहा वाजता बैठक

    भाजप आमदारांची आज सायंकाळी सात वाजता बैठक

  • 07 Jul 2023 03:21 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू शिर्डीतून रवाना

    राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू शिर्डीतून रवाना झाल्या आहेत. त्यांनी आज साईदर्शन घेतलं. त्याचबरोबर तिथं जेवणाचा प्रसाद सुध्दा घेतला. आज तिथं राष्ट्रवादीसाठी खास जेवणं तयार करण्यात आलं होतं.

  • 07 Jul 2023 03:19 PM (IST)

    २५० जणांना त्यांचं हक्काचं घर आपणं देत आहोत – फडणवीस

    २५० जणांना त्यांचं हक्काचं घर आपणं देत आहोत. आपल सरकारं आल्यानंतर ४ हजार जणांना घर देण्याचं काम आपणं सूरू केलं होतं. दुर्दैवाने मध्यंतरी यात कुठलच काम झालं न्हवत. गिरीणी कामगारांना हक्काचं घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न असल्याचं फडणवीस म्हणाले

  • 07 Jul 2023 03:17 PM (IST)

    गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळाल पाहिजे – अजित पवार

    आज बऱ्याच दिवासांचं स्वप्न आपलं पुर्ण होत आहे. गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळाल पाहिजे. गेली अनेक वर्ष तुमचं आणि मुंबईचं एक वेगळं नातं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आपण राबवत आहोत. सगळ्याकडं हक्काचं घर असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्यात देखील आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत आहोत असं अजित पवार म्हणाले.

  • 07 Jul 2023 03:09 PM (IST)

    शिवसैनिकांच्या जीवावर आमदारकी उपभोगली- अनिल परब

    निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून टिकेची झोड उठली आहे. निलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांच्या जीवावर आमदारकी उपभोगली, पक्षाच्या कठीण काळात अनेक संधीसाधू लोकांनी साथ सोडली अशी टिका अनिल परब यांनी केली आहे.

  • 07 Jul 2023 02:51 PM (IST)

    दोन्हीही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने सत्तेत सामिल झाल्याने आता काँग्रेसकडे बहूमत आलेले आहे. त्यामुळे दोन्हीही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यासाठी पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करण्यासाठी नेते दिल्लीला जाणार असल्याचेही कळत आहे.

  • 07 Jul 2023 02:40 PM (IST)

    निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय अत्यंत वास्तवादी- देवेंद्र फडणवीस

    निलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. निलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात येण्याचा निर्णय अत्यंत वास्तववादी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 07 Jul 2023 02:27 PM (IST)

    सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामांना गती दिली- मुख्यमंत्री शिंदे

    महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकास कामं थांबली होती. आम्ही सत्तेत आल्यानंतर अनेक विकास कामांना गती दिली असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार यावं ही जनतेची इच्छा होती असेही ते म्हणाले.

  • 07 Jul 2023 02:20 PM (IST)

    आजचा पक्ष प्रवेश हा ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे

    आमदार निलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना भाज युती ही किती मजबूत आहे हे आजच्या प्रसंगावरून लक्षात येते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. निलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. आजचा पक्षप्रवेश ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • 07 Jul 2023 02:11 PM (IST)

    निलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

    ठाकरे गटाच्या खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या नेते निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. विधान परिषदेतील 11 पैकी तीन आमदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची संख्या आता वाढत चालली आहे.

  • 07 Jul 2023 01:57 PM (IST)

    ठाकरे गटाला आणखी एक धक्का, नीलम गोऱ्हेंचा थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश

    थोड्याच वेळात नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत नीलम गोऱ्हे थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

  • 07 Jul 2023 01:49 PM (IST)

    पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर स्वागतच – नाना पटोले

    पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

  • 07 Jul 2023 01:29 PM (IST)

    शिवसेनेच्या 7 ते 8 आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याचे वृत्त

    त्या गटातील काही आमदारांनी परत येण्यासाठी संपर्क साधला आहे. आमदार परत येण्याबाबत निरोप येत आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पक्षात परत येण्यासाठी काही लोक निरोप पाठवत आहेत, असे ते म्हणाले.

  • 07 Jul 2023 01:12 PM (IST)

    भाजप फुटेल असा दिवस येऊ नये – पंकजा मुंडे

    भाजप फुटेल असा दिवस येऊ नये , असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचेही पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले.

  • 07 Jul 2023 01:06 PM (IST)

    सगळ्या चर्चांमधून अलिप्त होण्यासाठी 2 महिने सुट्टी घेणार – पंकजा मुंडे

    सगळ्या चर्चांमधून अलिप्त होण्यासाठी 2 महिने सुट्टी घेणार. अंतर्मुख होऊन, त्यानंतर निर्णय घेणार असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

  • 07 Jul 2023 01:00 PM (IST)

    पक्षाचा आदेश मी कायम अंतिम मानला – पंकजा मुंडे

    मला पक्षाने अनेकदा डावललं तरी मी नाराजी व्यक्त केली नाही. अप्रामाणिकपणा माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    लपूनछपून काम करणाऱ्यांचा मला कंटाळा आला आहे.

  • 07 Jul 2023 12:57 PM (IST)

    17 तारखेपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन होणार सुरू

    17 जुलैपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. 17 जुलै ते 4 ऑगस्ट या दोन आठवड्यांच्या कालावधीत अधिवेशन पार पडणार आहे.

  • 07 Jul 2023 12:19 PM (IST)

    Amol Kolhe | ‘छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, पण तुमच्या छंदाबाबत…’ अमोल कोल्हेंचा अढळरावांना थेट सवाल

    . “शिवाजी अढळराव पाटील यांना चार वेळा लोकसभेची संधी देऊनही, अढळराव पाटील यांनी स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसने मला एकदाच उमेदवारी दिली आणि शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात मी त्याच्या सोबत ठामपणे उभा आहे. हा अढळराव आणि माझ्यामधील मूलभूत फरक आहे” वाचा सविस्तर…..

  • 07 Jul 2023 12:07 PM (IST)

    अजित पवार यांची आज पत्रकार परिषद

    अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची संध्यकाळी पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय गौप्यस्फोट करणार आहे? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला नवीन गट तयार केला. आपलाच गट खरा असल्याचा दावा त्यांनी केला.

  • 07 Jul 2023 12:05 PM (IST)

    विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक

    विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटाचे नेते प्रथमच समोरासमोर येत आहे. अजित पवार आणि जयंत पाटील समोरासमोर येणार आहे. पावसाळी अधिवेशासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 07 Jul 2023 11:59 AM (IST)

    नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार

    विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वाचा

  • 07 Jul 2023 11:58 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे विधान भवनासाठी रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विधान भवनासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात विधानसभा कामकाज सल्लागार समिती आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. त्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत.

Published On - Jul 07,2023 11:30 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.