Eknath Shinde : फेसबुक लाईव्हला फेसबुक लाईव्हने उत्तर! 11 वाजता बंडखोर उदय सामंत या 3 मुद्दयांवर बोलणार?
उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उदय सामंत यांनीच गुवाहटीला जाण्याचा मार्ग स्वीकारला. यामागे त्यांच्या मनात मागील काही दिवसांपासूनची अस्वस्थता असू शकते.
मुंबईः शिंदेगटाकडून आलेली आताची महत्त्वाची बातमी म्हणजे कालच गुवाहटीत पोहोचलेले मंत्री उदय सामंत (Uday Samant) सकाळी 11 वाजेच्या सुमारास गुवाहटीतून संवाद साधणार आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार असून यात ते शिवसेनेवर गंभीर आरोप करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमच्यासाठी प्रत्यक्ष उपलब्ध नसतात, असा आरोप करणारे बंडखोर आमदार एकानंतर एक करत गुवाहटीत जाऊन बसलेत. पाहता पाहता शिवसेनेचे एकापेक्षा एक ताकदवान मंत्री आणि आमदार उद्धव ठाकरेंना दूर करत शिंदे गटात शामिल झाले. ठाकरे गटाला जबरदस्त धक्का म्हणजे आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू उदय सामंत यांनीही गुवाहटीची वाट धरली. उच्च व तंत्रशिक्षण खातं ज्यांच्याकडे आहे ते उदय सामंत आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनातली खदखद बाहेर काढतील. प्रत्यक्ष भेटी-गाठी टाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्हनेच सर्वांशी संवाद साधला, असा आरोप बंडखोरांनी केलाय. त्यामुळे आता उदय सामंतदेखील या रणनीतीला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच उत्तर देत आहेत. या संवादातून ते प्रमुख तीन मुद्दे मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरील नाराजी
उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उदय सामंत यांनीच गुवाहटीला जाण्याचा मार्ग स्वीकारला. यामागे त्यांच्या मनात मागील काही दिवसांपासूनची अस्वस्थता असू शकते. त्यामुळे आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उदय सामंत ठाकरे घराण्यावर आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून अवलंबलेल्या धोरणावर जोरदार टीका करू शकतात. पक्षप्रमुख किंवा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे कसे अपयशी ठरले, यावरही ते खंत व्यक्त करू शकतात.
2. आदित्य ठाकरेंना थेट प्रत्युत्तर
उदय सामंत यांच्याकडे पुण्याची जबाबदारी होती. उच्च शिक्षण व तंत्रज्ञान असं महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे होतं. तरीही त्यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडलं. यानंतर आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर अत्यंत तीव्र टीका केली. शिवसेनेतून घाण निघून गेलीय, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला. यावर बंडखोरांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांना आम्ही घाण वाटतोय का? असा सवाल त्यांनी केला. आता उदय सामंत आपल्या या भाषणातून आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्याची शक्यता आहे.
3. शिंदे गटाची पुढील रणनीती काय?
मंत्री उदय सामंत हे आजच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना एकनाथ शिंदे गटात आल्यानंतरची आपली रणनीती स्पष्ट करतील. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत, ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असं वक्तव्य बंडखोरांनी केलं आहे. या गटात उदय सामंतदेखील शामिल झाले असून एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारताना ते शिंदेंच्या पुढील रणनीतीवरही भाष्य करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत. उदय सामंतदेखील आता शिंदे गटाकडून भूमिका मांडू शकतात.