होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत… शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट असं का म्हणाले?
संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अमित शाह हेच शिंदे गटाचे प्रमुख आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला संजय शिरसाट यांनी संतप्त होत उत्तर दिलं आहे.

अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता. राऊत यांच्या या हल्ल्याचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
होय. अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. पण त्याचा तुम्हाला त्रास काय होत आहे? नालायक हो, तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळाभेट करत होता तेव्हा काय झालं? आम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना मानतो. त्यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.
मदत घेतली तर काय झालं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ताकद वाढवण्यासाठी आम्ही इतरांची मदत घेतली तर काय झालं? एकनाथ शिंदे हे संवाद ठेवणारे नेते आहेत. ज्यांना पक्षाचं काही देणं घेणं नाही, ते लोक दुसऱ्यांच्या पक्षात डोक घालण्याचं काम करत आहेत, असं सांगतानाच उदय सामंत हे चांगले नेते आहेत. त्यांच्या संदर्भात सगळ्यांना माहीत आहे. आम्ही उदय सामंत यांच्यासोबत आहोत, असं शिरसाट यांनी सांगितलं.
तो तर पक्ष बचाव मेळावा
ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आज त्यांचा निर्धार मेळावा नाही. तर पक्ष बचाव मेळावा आहे. ज्यांच्यामुळे पक्ष डॅमेज होत आहे, अशा लोकांना त्यांनी दूर ठेवलं आहे. त्यांना त्यांची जागा दिसली पाहिजे म्हणून असं केलं असेल, असा टोला त्यांनी लगावला.
नाशिकमध्येच विसर्जन
अंधारे बाईंना असं वाटतं की या पक्षाला मीच जन्म दिलाय आणि भास्कर जाधव तर त्या पक्षात राहतील की नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना विरोधीपक्ष नेत्याच गाजर दाखवण्यात आलं. यांच्या पक्षाचं विसर्जन देखील नाशिकमध्ये होईल, असं भाकीत त्यांनी केलं.
तर आवाज उठवणार
महायुतीतील नाराजी नाट्यावरही त्यांनी भाष्य केलं. महायुतीत नाराजी नाट्य नाही. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कधीही सहन करणार नाही. आंबेडकर जयंतीच्या दिवशीचा कार्यक्रम ठरवून झाला आहे. जेव्हा अन्याय होत आहे असं वाटलं तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणारच, असंही ते म्हणाले.
उजाड गावच्या पाटीलकीसाठी…
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उजाड गावची पाटीलकी कोण राखणार? याचा हा वाद सुरू आहे. खैरे बोलतात, मी सीनियर आहे, त्यामुळे पाटीलकी माझ्याकडे ठेवा. तर अंबादास दानवे बोलतात की, मी खरा पाटील आहे. त्यामुळे माझ्याकडे पाटीलकी द्या. निवडणुकीच तिकीट कोण विकणार? यासंदर्भात ही भांडण सुरू आहेत. यात सामान्य शिवसैनिकांच मरण होत आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.