पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात अखेर मान्सून सक्रीय झाला आहे. दहिहंडी उत्सवाला राज्यात सर्वत्र पाऊस परतला आहे. आता पावसाचा जोर आणखी दोन, तीन दिवस कायम राहणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगला होईल. यामुळे रब्बी हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी पावसासंदर्भात चांगली बातमी दिली आहे.
मान्सून सक्रीय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात बदललेली परिस्थिती कारण ठरली आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रवाताच्या परिस्थितीसोबत अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस असणार आहे. परंतु शुक्रवारी धुळे आणि जळगाव जिल्ह्याला शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
चक्रवाताच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्य प्रदेशात ढगांची गर्दी झाली आहे. तसेच अरबी समुद्रावरुन येणारे पश्चिमी वारे सक्रीय झाले आहे. यामुळे राज्यात मान्सून सर्वत्र सक्रीय झाल्याचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे. पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तासांत मध्य ते मुसळधार पाऊस असणार आहे. सोलापूर आणि सांगली वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून जळगाव, धुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे शहर आणि परिसरात दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. तसेच घाट माथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस ढगांची गर्दी कायम राहणार आहे. पाऊस परतल्यामुळे पुणे शहरातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. यामुळे पुणे शहरावर असलेले पाणी कपातीचे संकट टळणार आहे.