Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाची नेमकी स्थिती काय? कुठे गरजतोय, तर कुठे वाट पाहायला लावतोय; कधी धो-धो पडणार?
कोकणातील ठाणे आणि पालघर वगळता सर्व ठिकाणी, तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अद्यापही हवा तसा पाऊस पडताना दिसत नाहीय. विदर्भ, खान्देशातील काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत सलग दीड ते दोन तास पाऊस पडला आहे. पण तरीही राज्यात हवा तसा पाऊस पडताना दिसत नाही. यामागील नेमकं कारण काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडिया आणि विविध मुलाखतींमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाऊस राज्यात लवकरच स्थायिक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आणि मध्य भारतात पाऊस येण्यासाठी दोन महत्त्वाच्या शाखा आहेत. एक म्हणजे अरबी समुद्र आणि दुसरी शाखा म्हणजे बंगालचे उपसागर. या दोन्ही भागांमध्ये समुद्रात पोषक वातावरण निर्माण होतं आणि हे वारे बाष्पीभवन झालेले ढग आपल्यासोबत महाराष्ट्र, मध्य भारत आणि इतर राज्यांमध्ये घेऊन येतात. त्यानंतर चांगला पाऊस पडतो. पण सध्या बंगालच्या उपसागरात पावसाला पोषक अशा तितक्या हालचाली होताना दिसत नाहीत. असं असलं तरी आता अरबी समुद्रात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आजपासून 23 जूनपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, मेघर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि वायव्य भागाच्या उपसागराच्या आणि काही भागात, पश्चिम बंगालमधी गंगेचा खोऱ्याचा काही भाग, पश्चिम बंगालच्या उप हिमालयीन पर्वतरांगांचा काही भागात पावसाची वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आज कोकणात, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या संपूर्ण कोकणात, तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वारे ताशी 40 किमी वेगाने वाहण्यची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या 21 ते 23 जून या दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथेदेखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे आणि पालघर वगळता सर्व ठिकाणी, तसेच पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या चार दिवसात पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या पावासाच्या सरी बरसण्याचीदेखील शक्यता आहे.
दोन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता
विदर्भात मान्सून अजून दाखल व्हायचा आहे. तशाप्रकारची परिस्थिती आता दिसत आहे. राज्यात सध्या जो पाऊस पडतोय तो गडगडाटासह, मेघगर्जनेसह पडणारा पाऊस आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्याची आकडेवीर चांगली आहे. तिथे जवळपास 40 ते 50 मिमी पाऊस पडल्याची माहिती समोर येत आहे. तरीही मान्सून अजून सर्वदूर दिसलेला नाही. तरीही पश्चिमेकडच्या किनारपट्टीवर मान्सून परतण्याची शक्यता जास्त आहे. पश्चिमी वारे वाढल्यामुळे कोकणात आणि विदर्भात दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात असणारं वातावरण अद्यापही पावसासाठी हवं तसं पुरक झालेलं नाही. त्यामुळे पाऊस थोडा मंदावला आहे. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कारण अरबी समुद्रातील वारे कोकणाच्या दिशेला वाहताना दिसत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.