Doctor strike : निवासी डॉक्टरांचा उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा, डॉक्टरांच्या मागण्या काय? वाचा सविस्तर
राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बेदमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोना वाढला असताना डॉक्टारांनी संपाचा इशारा दिल्याने याचा रुग्णसेवेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : ओमिक्रॉन आणि कोरोनाचे संकट गडद होत असताना राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बेदमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोना वाढला असताना डॉक्टारांनी संपाचा इशारा दिल्याने याचा रुग्णसेवेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. संपावर जाणाऱ्या डॉक्टरांमध्ये सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील निवासी डॉक्टरांचा सहभाग असणार आहे अशी माहिती मार्ड संघटनेकडून देण्यात आली आहे. एकिकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार तर दुसरीकडे निवासी डॉक्टरांचा संप असा दुहेरी पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
डॉक्टरांच्या मागण्या काय?
नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विद्यार्थी रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवरील ताण वाढलाय, अशातच नव्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळेच या डॉक्टरांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. उद्या सकाळी 11 वाजेपासून महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा या निवासी डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेची तारीख जाहीर होईपर्यंत संपाचा इशारा
जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाहीस, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा सेंट्रल मार्डकडून देण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार असल्याची माहितीही मार्डकडून देण्यात आली आहे, त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोरील पेच वाढला आहे. राज्यात पुन्हा मोठी कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णवाढ होत असल्याने सहाजिकच मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. अशावेळी प्रशासन या संपावर कसा तोडगा काढतंय? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.