अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक आता हैराण होऊ लागले आहेत. मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. यामुळे मे महिना असूनही उन्हाळा जाणवत नव्हता. परंतु ८ मेपासून वातावरणात बदल झाला आहे. आता लोकांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. आता पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave, तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
काय आहे अंदाज
पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस उन्हाची तीव्रता वाढणार आहे. राज्यात 14 मे पर्यंत पुण्यात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे शहरातील तापमान 40°c पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहणार आहे.
जळगावात सर्वाधिक तापमान
राज्यात जळगावात सर्वाधिक तापमान होते. जळगावात ४१ अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. पुणे आणि मुंबई शहरातील तापमानात वाढ झाली आहे. पुणे शहराचे तापमान ३४.८ तर मुंबईचे तापमान ३२.९ अंश सेल्सियस होते.
Maharashtra temperature (8 May) | |
शहर | तापमान |
जळगाव | 41 |
अकोला | 40 |
मुंबई | 32.6 |
पुणे | 34.8 |
नागपूर | 38.9 |
नाशिक | 34.5 |
उष्णघातापासून अशी घ्या काळजी
उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त वेळ बाहेर राहू नका
उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.
आरामदायी कपडे घाला
उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे परिधान करा.