600 किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले (Maharashtra Thackeray Government big decision about 600 km of Panand Road).
अमरावती : “शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला (Maharashtra Thackeray Government big decision about 600 km of Panand Road).
अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यावेळेस ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह नगराध्यक्ष सुनीता फिसके, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
“शेतकऱ्यांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्यक आहेत, त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘कोरोनामुळे शेतकरी कर्जमाफीला उशिर’
“शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. कोरोनाचे संकट हे अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे, त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल. ज्याप्रमाणे आज पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे, अशाच पद्धतीने एकजुटीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सरकार सोबत असावे. आज पाणंद रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे, ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे”, असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं (Maharashtra Thackeray Government big decision about 600 km of Panand Road).
कार्यक्रमात राज्यमंत्री बच्चू कडू काय म्हणाले?
विविध स्तरावरील पाठपुरावा यातून बळीराजा पाणंद विकास अभियान मार्गी लागले आहे. एक किलोमीटरच्या रस्त्याची किंमत आठ लाखांपर्यंत कमी करण्यात आली आहे. या कामासाठी स्थानिक निधीमधून तसेच उपलब्ध गौण खनिज यामधून रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वांची मदत घेऊन दोन तालुक्यातील सुमारे 600 किलोमीटरचे रस्ते 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण केल्यास शेतकऱ्यांचा पाठिंबा राहील, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले. तसेच पाणंद रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी तातडीने दिल्यामुळे राज्य शासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले.
हेही वाचा : बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा