IMD weather forecast : नवं संकट राज्याच्या वेशीत… महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची निर्मिती; ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपले
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह कोकण, नाशिक, बुलढाणा, धुळे आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. राज्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ हवामानामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात अवकाळी पावसामुळे आंबे गळून पडले
रत्नागिरी जिल्ह्यावर चक्रीवादळासारख्या वाऱ्याची निर्मिती झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांसाठी कोकणात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकणात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. एका तासाच्या पावसामुळे तयार झालेले आंबे गळून पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात तयार होणाऱ्या लहान कैऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
रत्नागिरीतील राजपूर परिसरालाही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. राजापूर तालुक्यात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सिंधुदुर्गात आंबा आणि काजू बागांना मोठा फटका
सिंधुदुर्गात मध्यरात्री गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या हापूस आंबे तयार होण्याच्या स्थितीत असताना आलेल्या पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
वर्ध्यात पपईची बाग उद्धवस्त
वर्ध्यात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे पपईची बाग उद्धवस्त झाली आहे. सेलू तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी राजेंद्र लटारे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दीड एकर परिसरात पपईची लागवड केली होती.ही झाडे पूर्णपणे तयार झाली होती. या झाडांची तोडणी सुरू करण्याच्या वेळेवर वादळाने मोठे नुकसान केले. या वादळामुळे पपईची हजारो झाडे फळांसह तुटून पडली आहेत. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
बुलढाणा वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. बुलढाण्यात जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, मोताळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यांसह इतर भागांत अवकाळी पाऊस झाला आहे.
नाशिकमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष आणि कांदा पिकांचे नुकसान
नाशिक शहरालाही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. शहराच्या परिसरातील शिंदे पळसे, माडसांगवी, शिलापूर येथे गारपीट झाली. काही भागांत मध्यम, तर काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नाशिक शहरासह परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसाची पाच मिलिमीटर नोंद झाली आहे. काही भागांत तुरळक पाऊस, तर ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
धुळ्यात केळी आणि पपईचे नुकसान
धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे तालुक्यातील नेर येथे गारपीट झाली, ज्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका या पिकांना फटका बसला आहे. शिंदखेडा तालुक्यात जोरदार वादळामुळे केळी आणि पपईचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धुळे शहरात विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.