बेळगाव : बेळगावात कन्नडिगांचा उन्माद अजूनही सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सीमाभागातले वातवरण तापले आहे. कारण काही दिवासांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करत असल्याचा व्हिडिओ बंगळुरूमधून समोर आला होता, त्यावर मराठी बांधवांच्या आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या. याचवेळी काही काळ सीमाभातील वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले होते, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त मराठी बांधवांनी कोल्हापूर आणि बेळगावमधील कानडी व्यवसायिकांची दुकाने बंद केली होती.
कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा सुरूच
त्यानंतरही अजून हा वाद संपलेला दिसत नाही, बेळगाव जिल्ह्यात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा अजूनही सुरूच आहे. हुकेरीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या वाहनांचे पुन्हा नुकसान केले आहे. कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गाड्यांना कन्नड रक्षण वेदिकेचा झेंडा लावला, त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील नागरिक हा वाद पाहत आहेत. मराठी संस्थांवर बंदी आणण्याचा प्रस्तावही कर्नाटकच्या विधानसभेत मांडला होता, त्यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बेळगावसह राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर बोलताना बोम्मई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर सांगोळी रायण्णा आणि राणी चेनम्मा यांनी देशाच्या गौरवासाठी आणि रक्षणासाठी केलेलं कार्य महान आहे. दोघेही आमच्यासाठी आदर्शच आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या आदर्शावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांचा आदर राखणं हे प्रत्येकाचं काम आहे. मात्र काही समाजकंटकांकडून वाद निर्माण केला जात आहे. भाषा आणि इतर मुद्द्यांवरून हे लोक फूट पाडत आहे. अशी प्रतिक्रिया कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र तरीसुद्दा कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे या संघटनेला महाराष्ट्रतून आणि सीमाभागातून त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.