काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर दबाव, अखिलेश यादवच्या या चालीमुळे ‘मविआ’समोर संकट
सपा खासदाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन महाविकास आघाडीवर दबाव बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सपाला इंडिया आघाडीतून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यावर दबाव निर्माण करण्याची ही रणनीती आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहे. या पक्षांची जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्याचवेळी छोटे पक्ष आपल्या मागण्या लावून धरत आहेत. आता उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवणारी समाजवादी पक्षाने आपली चाल खेळली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या या चालीमुळे महाविकास आघाडीसमोर संकट उभे राहिले आहे. उत्तर प्रदेशातील ताकद सपा आता मुंबईत दाखवणार आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहे. 37 पैकी सपाचे 25 खासदार मुंबईत आले असून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामाध्यमातून अबू आझमी मुंबईत आपले सामर्थ्य दाखवणार आहे. यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदार समाजवादी पक्षाकडे आकर्षित होणार आहे.
सपा ताकद दाखवणार
मागील आठवड्यात मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने सपा नेते अखिलेश यादव मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करण्याचे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचा खासदारांचा सत्कार समारंभ मुंबईत होत आहे. वांद्रे येथील शारदा हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अखिलश यादव येणार नसले तरी सपाची ताकद त्यातून दाखवण्यात येणार आहे.
सपाचे लक्ष्य महाविकास आघाडी
सपा खासदाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन महाविकास आघाडीवर दबाव बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सपाला इंडिया आघाडीतून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यावर दबाव निर्माण करण्याची ही रणनीती आहे. राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, त्याठिकाणी सपाचे उमेदवार देण्याची मागणी अबू आझमी करणार आहे. तसेच मुंबईसारख्या ठिकाणी उत्तर भारतीयांना सपाकडे खेचण्याचे धोरण आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत सपाचे 2 आमदार निवडून आले होते. आता त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अबू आझमी प्रदीर्घ काळपासून महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचे अनेक नेते आमदार, खासदार निवडून आले. त्यानंतर बहुतांश लोकांनी पक्ष सोडला. माजिद मेनन, नवाब मलिक, युनूस अब्राहानी, वसीर पटेल, सोहेल लोखंडवाला, अस्लम शेख, हुसैन दलवाई, मोहसीन हैदर, अशरफ आझमी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत, ज्यांनी सपामधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. परंतु नंतर सर्वांनी पक्ष सोडला. पण अबू आझमी अजूनही समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत. आता पक्ष फुटी नये, ही खबरदारी अबू आझमी घेत आहेत.