शिंदे, फडणवीस की अजित पवार, महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? दिल्लीत उद्या नाट्यमय घडामोडी?
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत उद्या अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सहभागी होतील. मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. शिवसेना नेते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. या बैठकीचा निकाल राज्याच्या राजकारणाचा वेग ठरवेल. बैठकीनंतर नव्या सरकारची स्थापना होण्याची शक्यता आहे.
महायुतीची दिल्लीत उद्या बैठक होणार आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आणि भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं आहे. अमित शाह यांच्यासोबत उद्या रात्री या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार? हा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतरच राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार आहे.
एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत काय निर्णय घेतला जातो ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण तरीसुद्धा ते काय निर्णय जाहीर करतात, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या पत्रकार परिषदेआधी शिवसेनेचे काही दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे खरंच मोठं काहीतरी घडत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बैठकीत मोठा निर्णय होणार?
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत उद्या मुख्यमंत्रीपदाबाबत काय फॉर्म्युला ठरणार आहे, याबाबत सस्पेन्स आहे. सर्व पाच वर्ष भाजप आपल्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवणार की महायुतीमधील इतर दोन पक्षांसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेतं, ते उद्याच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे. कारण याच बैठकीनंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसणार आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे दिल्लीतील उद्याच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काही नाट्यमय घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.