शरद पवार गटात आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी प्रवेश केला? वाचा यादी
महायुती सरकारचा कामकाज सांगताना अजित पवारांना पक्षांतरावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी बबन शिंदेंवरच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी मिश्किल उत्तर देत हशा पिकवला. कोण कुठे पक्षांतर करतंय, त्यावरुन काय प्रतिक्रिया येतायत ते सविस्तर जाणून घेऊयात.
40 आमदार घेवून सत्तेत सामील झालेल्या अजित पवारांना शरद पवार धक्क्यांवर धक्के देत आहेत. अजितदादा गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंच्या वापसीच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवारांसह त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. दुसरीकडे जुन्नरमधील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या भेटीनंतर आता त्यांचे बंधू अमोल बेनकेंनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यावर अजित पवारांना प्रश्न केल्यावर बेनकेंच्या भेटीचं वृत्त त्यांनी नाकारलं. यादरम्यान पत्रकारानं बबन शिंदेंदेखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचा प्रश्न केला गेला, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी मिश्किल उत्तर देत हशा पिकवला. दरम्यान, विधानपरिषदेवर लागलेल्या वर्णीवरुन पुण्यातल्या अजित पवार गटात धुसफूस सुरु झाली आहे. दीपक मानकरांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पक्षात रुपाली चाकणकरांनी कशी विविध पदं मिळतात? यावरुन खदखद व्यक्त होते आहे.
सिंदखेडराजाचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. नाराज असलेले अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, विधानपरिषदेचे आमदार सतिष चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, पिंपरी-चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, सांगलीच्या खानापूरचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचीही चर्चा आहे. दिंडोरीत भाजपच्या भारती पवारांच्या नणंद गीतांजली, आमदार अतुल बेनकेंचे भाऊ, इंदापुरातील भाजपचे पृथ्वीराज जाचक, शेतकरी नेते रविकांत तुपकर, मोहोळचे रमेश कदम, झिरवाळांचा मुलगा गोकूळ झिरवाळ, पंढरपूरचे अभिजीत पाटील, तानाजी सावंतांचे पुतणे, अनिल सावंत यांनी गेल्या 2 दिवसात शरद पवारांची भेट घेतलीय.
शरद पवार गटात आतापर्यंत कुणी-कुणी प्रवेश केला?
आतापर्यंत दीपक चव्हाण, निलेश लंके, बाबाजानी दुर्रानी, भाग्यश्री अत्राम , हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे, तुमसरमधील भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, सुर्यकांता पाटील, फलटणचे संजीवराजे निंबाळकरांसहीत अनेक महायुतीची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केलाय. महायुती आणि मविआत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अजून दोन्ही बाजूनं पक्षांतरांना वेग येणार आहे. मात्र मविआत सध्या भंगार लोकांचं इनकमिंग सुरु असल्याचं म्हणत शिंदे गटाच्या शहाजी पाटलांनी पक्षांतरांवर टीका केलीय.