लोकसभा सोडा, विधानसभेला महायुती किती जागा जिंकणार?; काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांचं भाकीत काय?
mla shahaji bapu patil | जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटत असते. परंतु तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.
रवी लव्हेकर, पुणे | दि. 6 मार्च 2024 : निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे असतात. मध्यप्रदेश, राजस्थान त्याचबरोबर तेलंगणातील बीआरएसचा सर्वे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक मतदानाला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन होत असते. आम्ही आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या त्रिमूर्तीच्या जोरावर जिंकणार आहे. आम्हाला या निवडणुकीत 225 च्या वर जागा मिळणार असल्याचा दावा काय झाडी, काय डोंगर फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास
आमदार शहाजी बापू पाटील यांची विधाने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. ते पुणे दौर्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना अनेक घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.
संजय राऊत महाराष्ट्राचा खलनायक दुर्योधन
शाहजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्राचा खलनायक आहे. त्यांच्याकडे दुर्योधन म्हणून लोक पाहतात. त्यांच्या वक्तव्याकडे कोणी लक्ष देत नाही. जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटत असते. परंतु तिन्ही पक्षाचा सन्मान ठेवून जागावाटप होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्या जागेवर संदीपान भुमरे उमेदवार असतील. त्यांचा त्या ठिकाणी विजय निश्चित असल्याचा दावा शहाजी बापू यांनी व्यक्त केला. निवडणूक सर्व्हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.