नागरिकांनी फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादी बनवण्यासाठी वापर, जळगावात धक्कादायक प्रकार उघड
जळगाव शहरातील कुसूंबा नाका परिसरातील 'महाराष्ट्र गादी भांडार' येथे चक्क गादी बनविण्यासाठी लोकांनी वापरुन फेकून दिलेले मास्क वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Man make mattresses by used masks in Jalgaon)
जळगाव : जळगाव शहरातील कुसूंबा नाका परिसरातील ‘महाराष्ट्र गादी भांडार’ येथे चक्क गादी बनविण्यासाठी लोकांनी वापरुन फेकून दिलेले मास्क वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी यास अटक केली आहे. मन्सुरी हा जळगावात अमझदनगर येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मन्सुरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे (Man make mattresses by used masks in Jalgaon).
नेमकं प्रकरण काय?
राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकार आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करत आहे. पण जळगावमध्ये एक विकृत आणि विचित्र प्रकार समोर आलाय. जळगावच्या कुसूंबा नाक्याजवळ कृष्णा गार्डन हॉटेलच्या मागे असणाऱ्या गादीच्या दुकानात लोकांनी वापरलेल्या मास्कचा वापर करुन गादी बनवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस पाटलांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकार उघड
कुसूंबाचे पोलीस पाटील राधेश्याम पाटील यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर, शांताराम पाटील यांनी गादीच्या दुकानात धाड टाकली. याठिकाणी पाहणी केली असता, तिथे नागरिकांनी वापरलेल्या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
गांदी भांडारच्या मालकाला अटक
पोलिसांना गादीच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले. याबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गादी भांडारचा मालक अमजद मन्सुरी यास अटक केली. त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सिध्देश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत (Man make mattresses by used masks in Jalgaon).
हेही वाचा : रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक