येवल्यात शरद पवारांची मोठी खेळी, भुजबळांविरोधात मराठा कार्ड
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये येवला मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षांकडून अनेक मतदारसंघात आता आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येवला मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्याच यादीमध्ये या मतदारसंघातून भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर छगन भुजबळ यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर येवल्यामधून महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये येवला मतदारसंघाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून येवल्यामधून मणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या मतदारसंघामध्ये शिंदे आणि भुजबळ यांच्यामध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांचा विरोध
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठा लढा उभारला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध आहे. त्यामुळे राज्यात सध्या आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. भुजबळ हे ओबीसी नेते असून, जरांगे पाटलांच्या मागणीविरोधात ते सध्या ओबीसींची बाजू मांडताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या भुजबळ हे जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता शरद पवार यांनी येवल्यामध्ये माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांचं मराठा कार्ड यशस्वी होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.