maratha reservation | मनोज जरांगे यांची महत्वाची मागणी सरकारकडून मान्य?
maratha reservation issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मराठा आंदोलन संपणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांच्या शंभर टक्के मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यासंदर्भात लवकरच जीआर काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दत्ता कानवटे, जालना, दि.16 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन लवकरच संपणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची असलेली सगे सोयऱ्यांची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मनोज जरांगे यांच्या 100 टक्के मागण्या पूर्ण केल्याची माहिती सरकारकडून सांगितले जात आहे.
मनोज जरांगे यांना यश
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीत पहिल्यांदा उपोषण केले. 29 ऑगस्टपासून 2023 सुरु असलेल्या या आंदोलनावर 1 सप्टेंबर 2023 ला पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन देशभर पसरले. यावेळी आरक्षणासाठी काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडल्या. त्या मान्य करण्याचे सरकारने आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण केले. त्यावेळी सरकारने कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण देण्याचे मान्य केले. त्यानंतर काही दिवस सरकारला मुदत दिली अन् दुसरे उपोषण संपले. आता मनोज जरांगे पाटील तिसरे उपोषण 26 जानेवारीपासून मुंबईत सुरु करणार आहे. परंतु त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सचिवांचा कायदेतज्ञांना बोलवून सल्ला
मनोज जरांगे यांच्या 100 टक्के मागण्या पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन संपणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आता कुणबी नोंद आढळल्यास मराठा समाजातील सोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. विधी विभागाचे सचिव कायदेतज्ञांना बोलवून सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची एका मंत्र्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.
सरकारचे शिष्टमंडळ भेटणार
मनोज जरांगे यांना आज सरकारचे शिष्टमंडळ भेटणार आहे. यामुळे सरकारचा ड्रफ्ट त्यांना दाखवला जाणार आहे. त्यात सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची मागणी आहे. मनोज जरांगे यांनी हा ड्रफ्ट पहिल्यानंतर यासंदर्भात जीआर काढण्यात येणार आहे.