मनोज जरांगे पाटील पुन्हा कडाडले, ’10 दिवस शिल्लक, गाठ माझ्याशी आहे.’
१७ दिवस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे चार दिवस उपचार घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावात आगमन झाले.
जालना : 20 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्याची मुदत देण्यात यावी. एक महिन्यात मराठा आरक्षण देतो असे सांगितले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये म्हणून ओबीसी संघटनानी आंदोलन सुरु केले आहे. या दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळे राज्यसरकारची कोंडी झाली आहे. तर, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर मनोज ज्रांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी गावात आगमन झाले. गावातील महिलांनी जरांगे पाटील यांचे औक्षण करत स्वागत केले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार. महाराष्ट्रामधील पाच कोटी मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.
70 वर्षाच्या महिलांवर लाठीचार्ज केला आणि आता तुमच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने समिती नेमली. आता ही समिती विमान घेऊन पळत आहे आणि रिकामी परत येते, अशी टीका त्यांनी केली. तसेच, मराठा आरक्षण संदर्भातील समितीमध्ये मोडी आणि फारसी भाषा समजणाऱ्या तज्ज्ञांना घेण्यात यावे. अशी मागणी केली.
40 दिवसात आरक्षण द्या नाही तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा देऊन ते पुढे म्हणाले, आता उभे केलेले आंदोलन पहिले आणि शेवटचे आहे. मला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही. 40 दिवसात कसे आरक्षण देत नाही ते पाहतो. माझे कुटुंब संपले तरी चालेल. परंतु, पाच कोटी मराठा कुटुंबाना फायदा झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
माझ्यावर हल्ला करून उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला. आता सरकारसमोर एकच पर्याय आहे तो म्हणजे 40 दिवसानंतर आरक्षण दिले पाहिजे. मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकमेकांच्या अंगावर यायचे नाही. 14 तारखेला सरकारला दिलेल्या वेळेला 30 दिवस पूर्ण होत आहेत. तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या दिवशी आपण सरकारला जाब विचारणार आहोत. गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारला इशारा दिला.