प्रथमच आक्रोश मोर्चात मनोज जरांगे यांचे भाषण झाले नाही, कारण…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्यांना आज छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात जायचे होते. त्यांनी आम्हाला तसे कळवलेले होते, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहे. शुक्रवारी जालन्यात पाचवा मोर्चा निघाला. जालना शहरातील सकल मराठा समाज आणि मराठा संघटनांकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, दीपक केदार यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते. परंतु या मोर्चात मनोज जरांगे यांचे भाषण झाले नाही. त्याबद्दल चर्चा सुरु झाली. अखेर त्यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील हा पाचवा आक्रोश मोर्चा होता. चारही मोर्चात मनोज जरांगे पाटील यांचे भाषण झाले होते.
मनोज जरांगे यांनी का केले नाही भाषण?
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मनोज जरांगे यांनी भाषण का केले नाही, त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्यांना आज छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात जायचे होते. त्यांनी आम्हाला तसे कळवलेले होते. मोर्चा सुरू झाल्यापासून त्यांनी स्वतः सांगितले होते की माझी तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी बोलणार नाही.
वैभवी देशमुख काय म्हणाल्या…
मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख म्हणाल्या, माझ्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी मी मोर्चा सहभागी झाले आहे. माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करून तपास पूर्ण करावा. आमच्या कुटुंबियांना सरकारने न्याय द्यावा. धनंजय देशमुख म्हणाले, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी समाज आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून फाशी शिक्षा देण्यात यावी. आरोपीचा मोबाईल पोलिसांना सापडत नाही, तो पोलिसांनी शोधला पाहिजे.
संतोष देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी जालन्यात मोर्चा शुक्रवारी निघाला. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मोर्चेकरांची मागणी होती. संतोष भाऊला न्याय मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. देशमुख कुटुंब यांना संरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली.