जालना | 14 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी गर्जनाच मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच आपण आता टोकाचं उपोषण करणार असल्याचंही जाहीर करून टाकलं आहे. याशिवाय जरांगे पाटील यांनी टीकाकारांचाही चांगलाच समाचार घेतला आहे. मराठ्यांविरोधात टीका करायची आणि त्यांना फूस लावायची. त्यामुळे हिंसा होईल आणि मराठा समाजाला आरक्षण नाकारलं जाईल, हा त्यामागचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीतील जाहीर सभेतून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्ला केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेंना समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीस यांना समज देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांनाच समज देण्याची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सदावर्तेंनी माझ्यावर टीका केली. जरांगे पाटील हिंसा करणार आहेत. त्यामुळे जरांगे यांना अटक करा, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. भाऊ तुला एकदा सुट दिली. मराठा आरक्षणाच्या विरोधात तूच कोर्टात गेला. आता आमच्याविरोधात आग ओकायचं कमी करा. देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्तेंना समज द्यावी. सदावर्ते तुमचा कार्यकर्ता आहे. मराठ्यांना अंगावर घेऊ नका. 106 आमदार आम्हीच निवडून दिले हे विसरू नका. केंद्र आणि राज्यात मराठा समाजाने तुमची सत्ता आणली. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांना समज द्यावी. त्यांचे कार्यकर्ते अंगावर येत आहेत. मराठ्यांना विरोध करू नका. आम्हाला आऱक्षण द्या. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ. तुमच्या अंगावर गुलाल उधळायला आम्ही दिल्लीपर्यंत ट्रकच्या ट्रक घेऊन येऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सदावर्तेही उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता आहे. त्यांनी हे कार्यकर्ते पाळलेच कसे? उपमुख्यमंत्री लय आहेत. ती एक पंचायत झाली, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या टीकेचा समाचार घेतला. त्यांनी सांगितलं माझा आरक्षणाला विरोध नाही. पण माझ्या एकट्यावरच टीका केली जाते. त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करायचं बंद केलं. नंतर ते काल परत फडफडायला लागले. सभेवर 7 कोटी रुपये खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अरे वावर घेतलंय का येडपटा आम्ही. शेतकऱ्याने फुकट वावर दिलंय सभेसाठी. मराठा समाजाने स्वत: पदर खर्चानं वाहने आणली, असं त्यांनी सांगितलं.
लोकं दहा रुपयेही देत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला देत नसतील. तुम्हाला का देत नसतील ते सांगतो. ज्या मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली. गोरगरीबांचे पैसे खाल्ले आणि आत जाऊन बेसन खाऊन आलात. आम्हाला शिकवता पैसे कुठून आले? आम्ही घाम गाळतो. आमच्या 123 गावांनी पैसा जमा केला. कापूस विकून पैसा जमा केला, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी सभेच्या खर्चाचा तपशीलच दिला. 123 गावांपैकी 22 गावातील लोकांनी पैसे दिले. 21 लाख रुपये जमा झाले होते. अजून गावे बाकी आहेत. त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. पैशासाठी नाही तर जनतेसाठी आंदोलन करत आहोत, असं जरांगे म्हणाले. भुजबळांना वाटलं आपण 117 एकरमध्ये सभा घेतली. अजितदादा ते तुमच्या पक्षाचे आहेत, समज द्या. मग मी मागे लागलो तर सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.