मनोज जरांगे दहा टक्के आरक्षण घेण्यास तयार, पण घातली ही अट
maratha reservation issue | आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला. कारण मी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले आहे. यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही.
बीड | दि. 29 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील तडजोडीला तयार झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु त्यासाठी एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी ‘एससीबीसी’ आरक्षण दिले आहे. आधी हे आरक्षण मान्य नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. आपणास ओबीसीमधून आरक्षण हवे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता मात्र ‘एससीबीसी’चे दहा टक्के आरक्षण घेण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दर्शवली आहे. परंतु हे दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या आत घेतले पाहिजे, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली आहे.
आधी एसआयटी नको, आता एसआयटी बनवली
फडणवीस यांचा डाव यशस्वी होत नाही तोवर लढणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा एसआयटी चौकशीची मागणी झाली. त्यावेळी फडणवीस यांनी म्हटले पोलिसांचा रिपोर्ट आला आहे. त्यात एसआयटी स्थापन करायची गरज नाही, असे म्हटले होते. मग आताच का एसआयटी चौकशीचा निर्णय झाला. कारण मी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण नाकारले आहे. यामुळे एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे.राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही. त्यासाठी आम्ही बोलत नाही. परंतु ओबीसीमध्ये जे फायदे आहेत, ते आम्हाला मिळाले पाहिजे.
एका अधिवेशनात बोलता अधिवेशनात एसआयटी चौकशी नको. दुसऱ्या अधिवेशनात चौकशी लावण्याचे आदेश देता. न्यायालय सांगते शांततेत आंदोलन करा. मग आम्ही शांततेत आंदोलन केले. मात्र गुन्हे दाखल केले जात आहे. खुन्नस दाखवली जात आहे. तुम्ही फुगे फोड्याची बंदूक दाखवता. मात्र मराठे घाबरत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मग तुम्हाला ‘अहो जाओ’ …
अरे करे केलं म्हणालो, अशी टीका माझ्यावर झाली. मग अहो जाओ केल्यानंतर सगे सोयऱ्याची मागणी पूर्ण करणार का? मग रोज अहो जाओ करतो. मराठ्यांना सांगतो यांना अहो जाओ करा. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. पण त्यांनीही समाजाची नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांची भावना समाजाच्या प्रती बरोबर आहेत. परंतु सध्या ज्वलंत मुद्दा असताना राजकीय निर्णय नको. माझा तो मार्ग नाही. माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा आरक्षण आहे.