स्मार्ट सिटीच्या नादात ‘कत्तल’ झाली, मंत्री म्हणतात नो, नाय, नेव्हर
विधानसभेत उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्यातील स्मार्ट सिटीसंदर्भांत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रभू यांना असत्य ठरवले. प्रभू जे काही म्हणाले त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई | 18 जुलै 2023 : राज्यात स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकासकामे सुरु आहेत. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्यांची तसेच फुटपाथची बांधकामे सुरु आहेत. ही कामे करत असताना सुमारे 7 लाख झाडांची कत्तल करण्यात आली. 2018 मध्ये वृक्ष कोसळल्याने मृत पावलेले वकील किशोर पवार यांच्या पत्नीला ठाणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर नोकरी देण्यात आली. पण, त्यांना सेवेत कायम केले नाही. कोलबाड येथे पिंपळवृक्ष कोसळून अर्पिता वालावलकर यांचा मृत्यु झाला. परंतु, त्यांनाही अद्याप मदत मिळाली नाही. त्यांच्या कुटुंबातील कोणालाही नोकरी देण्यात आलेली नाही.
उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत हा मोठा आरोप केला. राष्ट्रीय हरित लवादाने 2015 साली सर्व शहरांसाठी दिलेल्या महत्वाच्या आदेशाचे ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने दुर्लक्ष केल्याची टीका करतानाच महापालिका झाडांची कत्तल करत असल्याची टीका त्यांनी केली.
ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील वृक्ष मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन पर्यावरणाचा ह्रास होत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका आमदार सुनील प्रभू यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्मार्ट सिटी योजनेतील कामात महापालिका आयुक्तांच्या सहमतीने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तर भाजप आमदार संजय केळकर यांनी वृक्ष प्राधिकरण समिती झाडांच्या बाबतीत मनमानी धोरण राबवित असल्याची टीका केली.
आमदार्नी उपस्थित केल्या या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, ठाण्यात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विकासकामांमध्ये अत्यंत पारदर्शकता आहे. सिमेंट रस्ते आणि फुटपाथचे बांधकाम करताना झाडांची काळजी घेतली जात आहे. मात्र, विकासकामांसाठी 7 लाख झाडे तोडली ही बाब असत्य आहे. तसेच, बांधकाम करताना झाडांची पूर्ण काळजी घेऊन त्यांचे पुनर्रोपण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.