जळगावात उन्हाचा तडाखा तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता
देशात अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. विदर्भात एकीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला गेला असताना जळगावात मात्र उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा अंदाज आहे.
विदर्भात ऐन मे महिन्यात पावसाचे सावट कायम आहे. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मे महिन्याचा पंधरवडा लोटूनही विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळीवाऱ्यासह गारपीट अनुभवायला येत आहे. त्यामुळे शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे.
मावळमध्ये आज अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे पॉलीहाऊस, पोल्ट्री फॉर्म आणि घरांची पडझड झालीये. तसेच रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसाचा मावळमधील बेजल गावाला तडाखा बसला आहे. शेकडो एकरवरील पॉलिहाऊसची पडझड झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच राजपुरी येथील घरे व पोल्ट्रीं अवकाळी पावसाने पडले आहेत. मावळ कृषी अधिकारी यांनी त्वरित पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई देण्याची मागणी बेलज ग्रामस्थांनी शासनाला केली आहे.
जळगावात पारा 43 अंशांवर
जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकतो आहे. दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना तापमानापासून दिलासा मिळाला होता. आता पुन्हा तापमानाचा पारा वाढल्यामुळे आणि उष्ण लाटांमुळे जळगावचं जनजीवन प्रभावित झाले आहे.
उद्यापासून पुढचे तीन दिवस 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. नागरिकांना मेचा तडाखा आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे. उष्णता वाढल्याने नागरिक शीतपेय आणि रसवंतीच्या दुकानांवर गर्दी करत आहेत.
दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यांवर शुकशुकट दिसतोय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जास्तीत जास्त पाणी प्यावे असं जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आवाहन करण्यात आले आहे.
यंदा मान्सून वेळेआधी
यंदा मान्सुन वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा ३१ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून तीन दिवस आधीच कूच करत आहे. यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.