राज्यातील अनेक शहरांमध्ये नागरिकांना रेशन दुकानांवर धान्य मिळेना, नेमकं कारण काय?
राज्यातील अनेक शहरांमध्ये रेशन कार्डधारक नागरिकांना धान्य मिळणं बंद झालं आहे. त्यामुळे लाखो नागरीक त्रस्त झाले आहेत. काही तात्रिंक अडचणींमुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे रेशन दुकानांच्या मालकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार देऊनही त्यावर तोडगा निघताना दिसत नाही.
नागपुरात गेल्या 20 तारखेपासून रेशन दुकानातील पीओएस मशीन बंद असल्याने ग्राहकांना धान्य वितरण करणं बंद झालं आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहक तर दुसरीकडे दुकानदार त्रस्त झाले आहेत. दुकानदाराकडे धान्याचा स्टॉक येऊन पडलाय. मात्र त्याचं वितरण करता येत नसल्याने आणि ही अडचण केव्हा दूर होते हे माहीत नसल्याने दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्यांना वापस पाठवावं लागत आहे. तर दुसरीकडे ग्राहक मात्र धान्य घेण्यासाठी दुकानात चकरा मारत आहेत. काहींच्या घरी अन्नधान्य नसल्याचं सुद्धा ग्राहक सांगत आहेत. मात्र आता ऑफलाईन पद्धतीने वितरण करा, अशा प्रकारचे आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत. पण यातही दुकानदारांमध्ये मोठा संभ्रम आहे. कारण ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण केल्यास त्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा? हा प्रश्न असल्याने दुकानदारा समोर चिंतेचा विषय असल्याचं ते सांगत आहेत. तर ग्राहक मात्र रोज चकरामारून त्रस्त झाल्याचं सांगत आहेत.
नाशिकमध्ये 72 हजार रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित
नाशिकमध्ये सुद्धा रेशन दुकानांवरची धान्य वाटप यंत्रणा सध्या ठप्प पडल्याचं बघायला मिळत आहे. शहरातील सुमारे 250 दुकानात सुरू असलेली ऑनलाईन यंत्रणा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बंद झाली आहे. यामुळे सुमारे 72 हजार रेशन कार्डधारक रेशन धान्यापासून वंचित राहिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातही तीच अवस्था
भंडारा जिल्ह्यातही तीच अवस्था आहे. जिल्ह्यात रेशनचं मशीन बंद असल्यानं 15 दिवसांपासून लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित आहेत. सर्व रेशन कार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. पॉस मशीनचं सर्व्हर मागील 15 दिवसांपासून डाऊन आहे. त्यामुळे याचा फटका लाभार्थ्यांना बसतोय. भंडारा जिल्ह्यात जवळपास 2500 रेशन दुकान असून त्या माध्यमातून 5 लाख 61 हजार 92 अंत्योदय आणि बीपीएलचे राशनकार्डधारक धान्याची उचल करतात. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकान बंद आहेत. यामुळे रेशनच्या प्रतिक्षेत सर्व राशनकार्ड धारक आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रेशन दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा
रत्नागिरीत रेशन दुकानावरील धान्य वितरित करण्यासाठी देण्यात आलेलं पॉस मशीनला रेंज नसल्याची माहिती मिळत आहे. पॉस मशीनला रेंज मिळत नसल्याने धान्य वितरणात अडचणी येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानांवर गोंधळ बघायला मिळतोय. जुलै महिन्यातील 80 ते 85 टक्के धान्य वितरण झालं नाही. मशीनला रेंज नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानाबाहेर धान्य घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
अमरावतीतही रेशन दुकानांमध्ये धान्य वाटप बंद
अमरावतीत रेशन दुकानात धान्य वाटप बंद आहे. रेशन दुकानातील पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. रेशन दुकानदारांनी शासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पण तरीही तोडगा निघत नसल्याने रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत. अमरावतीसह राज्यात पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आली असल्याची माहिती आहे. या तांत्रिक बिघाडामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाहीय. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे. शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी आता होत आहे.
दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मिळणार धान्यांसाठी ई-केव्हायसी बंधनकारक
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १२ लाख शिधापत्रिकाधारक असून या लाभार्थ्यांना धान्य वाटप करत असताना रेशन दुकानदारांना दिलेल्या पॉस मशीनच्या सर्व्हरला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे रेशन कार्डधारकांचे अंगठे घेण्यास विलंब होत आहे. धान्य वाटपास काही वेळा विलंब होत आहे. अशातच ई-केवायसी करतानादेखील रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होत आहेत. जुलै महिन्याच्या धान्य वाटपासदेखील अशाप्रकारे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ३० ऑगस्टपर्यंत धान्य वाटपास आणि ई- केवायसीसाठीदेखील डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.