सरकारच्या शिष्टमंडळाची उद्यापर्यंत वाट पाहू, त्यानंतर… मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा काय?
Manoj jaranage patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. भुजबळांच्या नातेवाईकाचं हॉटेल त्यांच्याच समाजातील लोकांनी हॉटेल फोडलं असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर : “सीएमओ ऑफिसमधून रात्री फोन आला होता, उद्या शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. बघू, ते झुलवतात. पण त्यांनी कारणही सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरला गेले म्हणून परवा येतो म्हणाले. त्यामुळे वाट बघू. परवाची आम्ही वाट बघू. म्हणजे उद्याची. नाही तर मग आम्हीही पुढची भूमिका घेऊ” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. “ओबीसी नेते त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्यांच्याबद्दल सांगणारही नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याकडे आहे. सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याकडे आहे. आम्ही आमचं ठरवलं आहे. मी मराठा समाजाला आवाहन करतो. आपल्या गोरगरीबांचं कल्याण होणार आहे. फक्त एक दोन ओबीसींना ते पाहावत नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांततेत आपली एकजूट वाढवा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे सर्व पक्षांचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे, जाणूनबुजून षडयंत्र रचलं जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या पोरांना केसेसमध्ये अडकवलं जात आहे. त्यामुळे त्या मुलांकडे लक्ष ठेवा, कारण उद्या तुम्हाला याच मराठ्यांच्या पोरांची गरज पडणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मदत केली नाही, तर महाराष्ट्रातील मराठ्यांची पोरं तुम्हाला कधीच माफ करणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “षडयंत्र काय आहे हे तुम्हाला सांगतो, मला एक रात्री माहिती मिळाली. खोटी असेल तर मी माझे शब्द मागे घेईल. बीडचे काही बांधव काल आले होते. भुजबळ साहेबांच्या नातेवाईकाचं जे हॉटेल फुटलंय ते त्यांच्याच लोकांनी फोडलंय आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
‘भुजबळांच्या नातेवाईकाचं हॉटेल त्यांच्याच समाजातील लोकांनी हॉटेल फोडलं’
“मराठे शांततेत आंदोलन करत आहेत. यात सत्ताधाऱ्यांचेच लोकं आमच्या मराठ्याच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी म्हणायचो, ते तंतोतंत खरं ठरत आहे. भुजबळांच्या नातेवाईकाचं हॉटेल त्यांच्याच समाजातील लोकांनी हॉटेल फोडलं अशी मला ऐकीव माहिती मिळाली. त्याचबरोबर पूर्ववैमन्यस्यातून त्यांनी एकमेकांची घरे फोडली, दगड मारले ही मागे म्हणालो होतो ते सत्य होणार आहे” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.