आमची लेकरं रोडावर हिंडायलेत, आरक्षण का देत नाही? 85 वर्षांच्या आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल!
आजीबाई इतक्या चिडल्यात की त्यांच्या समोर कुण्या आमदाराला, मंत्र्याला उभं केलं तर ते सुद्धा घाबरतील. 85 वर्षांच्या या आजी परभणीतील आहेत. आजीचं नाव आहे कृशेवर्ता ढोणे परभणीच्या पूर्णा तालुक्यात त्या राहतात. आम्ही गरिबीतून शिकलोय, आम्ही मजुरी करून आमच्या लेकरांना शिकवलंय. आमच्या लेकरांना का देत नाही तुम्ही आरक्षण? असं त्या म्हणतायत.
नजीर खान, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, परभणी | 31 ऑक्टोबर 2023 : राज्यभरात सगळीकडे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं सुरु आहेत. आंदोलन हळूहळू इतकं तीव्र झालंय की नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. अनेक नेत्यांना तर सरकारडून सुरक्षा देखील देण्यात आलीये. मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर चोख बंदोबस्त आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची झळ एसटी बसेस, नेत्यांची घरे, गाड्या या सगळ्याला बसलीये. संतप्त आंदोलकांनी तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंकी यांची घरे जाळली. आंदोलनाचे पडसाद राज्यभरात दिसून येतायत. यादरम्यान अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होतायत ज्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करतायत. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ८५ वर्षांच्या आजी आरक्षणाची मागणी करतायत. मागणी करताना आजी इतक्यावरच थांबत नाहीत तर सरकारला जाब विचारतायत, “आमच्या हक्काचं आहे, आम्हाला ते का देत नाही?”
आमचे लेकरं रोडवर हिंडायलेत
“आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे, आमचे लेकरं रोडवर हिंडायलेत. आम्ही गरिबीतून शिकलोय, आम्ही मजुरी करून आमच्या लेकरांना शिकवलंय. आमच्या लेकरांना का देत नाही तुम्ही आरक्षण? या तुम्ही रस्त्यावर मी तुम्हाला चप्पलेने हाणते. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे, का देत नाही तुम्ही आम्हाला आरक्षण?” आजीबाई इतक्या चिडल्यात की त्यांच्या समोर कुण्या आमदाराला, मंत्र्याला उभं केलं तर ते सुद्धा घाबरतील. 85 वर्षांच्या या आजी परभणीतील आहेत. आजीचं नाव आहे कृशेवर्ता ढोणे परभणीच्या पूर्णा तालुक्यात त्या राहतात.
व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल
राज्यातील अनेक शहरात आंदोलन हळूहळू संतप्त होत चाललंय. जरांगे पाटलांनी शांततेचं आवाहन केलंय पण आंदोलकांचा संयम हळूहळू सुटत चाललाय. आता यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सामील होतायत. लोकांच्या मागणीपासून ते जाळपोळीपर्यंतचे व्हिडीओ व्हायरल होतायत. पुणे-लासलगाव ही हिरकणी एसटी बस पुणे येथून लासलगाव येथे येत असताना मराठा आंदोलकांनी पेटवून दिलीये. या जाळपोळीच्या, आंदोलन संतप्त होत चाललंय या प्राश्वभूमीवर अनेक निर्णय घेण्यात आलेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातून मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या ST बस सेवा बंद करण्यात आली आहे. अकोल्यातून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.