मराठा आंदोलकांची मोदींच्या वारणासीत मोहीम, लोकसभा निवडणुकीत अडचणी आणण्याची तयारी
Maratha Reservation | मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर झालेल्या वाराणसी मतदार संघात अडचणी निर्माण करण्याची कुटनीती तयार केली आहे.
संतोष जाधव, धारशिव | दि. 12 मार्च 2024 : मराठा समाजाला राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. परंतु मराठा समाजाची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलन सुरु आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशासनापुढे अडचणी निर्माण करण्याची तयारी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी जाहीर झालेल्या वाराणसी मतदार संघात अडचणी निर्माण करण्याची कुटनीती तयार केली आहे. त्यासाठी वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 1 हजार उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे. हजारापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.
आत्मक्लेश आंदोलन करणार
मराठवाडा व महाराष्ट्रातून वाराणसीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे मराठा आरक्षणाचे आंदोलक विनायक पाटील यांनी म्हटले आहे. त्यासाठी वाराणसीत आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन करणार आत्मक्लेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी विनायक पाटील यांनी केली आहे.
नांदेडमध्ये घराघरावर स्टिकर, पुढाऱ्यांनी येऊ नये
नांदेडमध्ये नुकतीच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची यांची सभा झाली होती. यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला घरावर स्टिकर लावण्याचे आव्हान केले. त्यावर मी मतदार, पुढाऱ्यांनी आमच्या दारात मत मागायला यायचं नाही असं आवाहन करण्याचे म्हटले होते. त्यानंतरचा अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील मराठा समाजाने घरोघरी असे स्टिकर लावून आंदोलन उभ केले आहे.
काय म्हटले स्टिकरमध्ये
महादेव पिपळगाव येथे मराठा समाजाने आपल्या घरावर ” मी मतदार, एक मराठा, कोटी मराठा, मराठा समाजास ओबीसीतून हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्या घरी मत मागायला यायचं नाही ” असे स्टिकर घरोघरी दरवाज्यावर झळकतांना दिसत आहेत. त्याचबरोबर नांदेड लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने मराठा मतदाराने घेतलेली ही भूमिका उमेदवारांसाठी अडचणीची ठरू शकते.