मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इम्तियाज जलील यांना मोठा इशारा, एमआयएमच्या अडचणी वाढणार?
औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून साखळी उपोषणाला सुरु करण्यात आलीय. पण जलील यांच्या आंदोलनावरुन मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामांतराला केंद्र सरकारने देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव आता अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असं करण्यात आलंय. पण या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी विरोध केलाय. विशेष म्हणजे त्यासाठी इम्तियाज जलील यांचं दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून साखळी उपोषणाला सुरु करण्यात आलीय. पण जलील यांच्या आंदोलनावरुन मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे.
“राज्यात हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न इम्तियाज जलील करत आहेत. त्यांच्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये तमाम शिवप्रेमींनी गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे इम्तियाज जलील औरंगजेबाच्या समर्थनार्थ आंदोलन करत असेल ते कदापि चालू देणार नाही”, असं आबासाहेब पाटील म्हणाले आहेत.
“ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांचे आंदोलन सुरू आहे त्याच ठिकाणी राज्यातील तमाम सर्व संघटना, मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा सुद्धा आंदोलन करेल”, असा इशाराही आबासाहेब पाटील यांनी दिलेला आहे.
एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकला
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे नामांतराला विरोध करत आहेत. त्यासाठी त्यांनी कालपासून आंदोलनाला सुरुवातदेखील केलीय. पण त्यांच्या आंदोलनात काल अतिशय विचित्र आणि धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला. विशेष म्हणजे औरंगजेबाचा फोटो बराच वेळ आंदोलनास्थळी झळकवण्यात आला. नंतर या मुद्द्यावरुन टीका व्हायला लागल्यानंतर तिथून तो फोटो हटवण्यात आला. संबंधित प्रकारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी संबंधित प्रकार चुकीचा असल्याचं म्हणत आपण त्याचं समर्थन करत नाही, असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या मुद्द्यावरुन जलील यांच्यावर टीका केली आहे. संबंधित धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एमआयएमशी संबंधित असा प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी आमदार अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिली होती. त्यामुळे देखील मोठा राजकीय वाद उफाळला होता.