निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगे यांचा महायुतीला मोठा इशारा, पाहा नेमकं काय म्हणाले?
"तुम्ही सत्तेत होता. पण शेवटी मतदान हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सर्व शक्ती लावली. तुम्ही सत्तेचा गैरवापर केला. पण तुम्हाला सत्तेवर बसू द्यायचं की नाही हे माझ्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही", असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिला आहे. “तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही”, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी वारंवार उपोषण आणि आंदोलने केली. पण त्यांच्या सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी याआधीच विधानसभेत महायुतीला धडा शिकवू असा इशारा दिला होता. यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
“तुम्ही सत्तेत होता. पण शेवटी मतदान हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सर्व शक्ती लावली. तुम्ही सत्तेचा गैरवापर केला. पण तुम्हाला सत्तेवर बसू द्यायचं की नाही हे माझ्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही”, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “मराठ्यांना बाजूला ठेवून ते सत्तेवर येऊच शकत नाही. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी शक्य नाही. इथं प्रश्न फक्त मराठ्यांचा नाही, मुस्लिमांचा आहे. दलितांचा आहे. शेतकऱ्यांचा आहे. १४ महिने ताकद दाखवली. आता मराठ्यांना विनंती आहे, आता बळ आणि एकजूट दाखवा. मतदानात ताकद दाखवा. १०० टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. माता माऊल्या आणि विद्यार्थीनी, विद्यार्थी, म्हातारे कोतारे, पुरुष मंडळी एकही मराठ्याचं मतदान घरात राहता कामा नये”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
‘त्यांची पूर्ण जिरवा, ताकद दाखवा’
“लेकरासाठी १४ महिने ताकद दाखवली. तसंच १०० टक्के मतदान करा. तुमच्या मुलाची, समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. हा समाज हारू देऊ नका. ही धुरा तुमच्या खांद्यावर आहे. सरकारवर धुरा होती. त्यांनी जातीवाद करून ही जबाबदारी दुषित केली. आता धुरा तुमच्याकडे आहे. मत तुमच्याकडे आहे. त्यांच्याकडे नाही. मुलं आणि मुलांचा समाजासााठी वापर करा. आता त्यांनी दिलं नाही असं म्हणू नका. कारण मतं तुमच्या हाती आहे. त्यांची पूर्ण जिरवा. ताकद दाखवा. मी ईमानदारीने तुमचा मुलगा म्हणून सातत्याने आंदोलनात आहे. मागे जशी ताकद दाखवली, लोकसभेला. आता विधानसभेला दुप्पट ताकद दाखवा”, असंदेखील आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं.
‘सरकारने आपल्या लढाईत बेदखल केलं’
“शेवटचं सांगतो. प्रतिष्ठेची लढाई आहे. आपल्या मुलांचा मुडदा पडला पाहिजे, या राज्यात एक बाप आणि माय नाही की तिला वाटत नाही की आपलं पोरगं मोठं व्हावं. एक भाऊ नाही की त्याला वाटत नाही बहीण मोठी होऊ नये. प्रत्येक माय बापाला मुलं मोठी व्हावी वाटत आहे. या सरकारने आपल्या लढाईत बेदखल केलं. आपला अपमान केला. आपल्याला हिणवलं. आपल्याला खुन्नस म्हणून इतर १७ जाती ओबीसीत घातल्या. आपल्याला चॅलेंज आहे. आपल्याला ते आरक्षण देणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवा आता तुम्हाला जात मोठी करायची, मुलगा मोठा करायचा की जातीचा आमदार मोठा करायचा. तुमची मुलगी आणि मुलगा नरक यातना सोसत आहे. त्याचा आक्रोश आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘मराठ्यांनो जागे व्हा’
“तुमचा मुलांचा आक्रोश सरकारने जाणला नाही. तुमची लेकरं मेले तरी त्यांना घेणंदेणं नाही, तुमच्या जमिनी गेल्या तरी त्यांना घेणं नाही. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये याचा पण त्यांनी घेतला आहे. त्यांना तुमची मुलं भिकारी करायचे आहे. त्यामुळे आता तुमच्या हातात आहे. आपली ताकद दाखवा. मराठ्यांनो जागे व्हा. मी सांगतो म्हणून नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात असा. तुम्ही आज संध्याकाळी मुलाल जवळ घेऊन बसा. त्याला आरक्षणाचं महत्त्व विचारा. त्यावरून तुम्हाला आरक्षणाचं महत्त्व कळे. फडणवीसने तुमच्या मुला मुलींना संपवण्याचं ठरवलं आहे. अशा लोकांना निवडून दिलं तर तुम्ही तुमच्या मुलांची अग्निपरीक्षा पाहत आहात”, असंदेखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.