मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, मुंडे बहिण-भावावर आरोप करत दिला मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी मुंडे बहिण-भावावर आरोप करत त्यांना गंभीर इशारा दिलाय. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर जातीवादाचा आणि पंकजा मुंडेंवर धमकी दिल्याचा आरोप केलाय.
मराठा आरक्षणावरुन सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीडच्या मुंडे बहिण-भावावर जरांगे पाटलांनी हल्लाबोल केलाय. मुंडे बहिण-भाऊ समाजाला फूस लावून धमक्या देत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मुंडे-बहिण भावाकडून मला धमक्या, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी “कोणीतरी बोलतं. त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, जरांगे पाटील आणि पंकजा मुंडेंच्या वादाला सुरुवात ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झाली होती.
उपोषण करुन कुणाला आरक्षण मिळत नसल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. यानंतर जरांगे पाटलांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला होता. “उपोषण करुन आरक्षण मिळत नसतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर “तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला येऊ नका”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. तर “वर्षभरात मी जरांगे पाटलांचं नावच नाही घेतलं”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांचा मोठा इशारा
मराठा आरक्षणावरुनही जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याचा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी दिलाय. “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेत 288 मतदारसंघात उमेदवार देणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा नेत्यांना देखील धारेवर धरलंय. तसंच विधानसभा निवडणुकीत मराठा नेत्यांचं नाव घेऊन पाडायला लावणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “जरांगे आणि आमचं कोणतंही भांडण नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मुंडे बहिण-भावावर आरोप करत हल्लाबोल केलाय. दरम्यान आडवे आल्यास बघून घेण्याचा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी दिलाय. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.