छगन भुजबळ यांचा ‘या’ दोन नाटकांवर अभ्यास…मनोज जरांगे सोबत भुजबळांनी कोणाला लगावला टोला
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर भुजबळ यांनी ज्या दोन नाटकांची नावे सांगितले त्यावरुन भुजबळ यांचा टोला कोणाला आहे, त्याची चर्चा रंगली आहे. जरांगे यांनी रविवारी ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यानंतर गृहखाते आक्रमक झालेले दिसत आहे.
अक्षय मंकनी, मुंबई, दि. 26 फेब्रुवारी 2024 | राज्यातील मराठा आंदोलना दरम्यान सर्वांचे लक्ष दोन जणांवर होते. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ. या दोघांमधील कलगीतुरा रोज गेल्या काही दिवसांपासून रंगत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष केले. यावेळी त्यांनी शिवराळ भाषाही वापरली. त्यानंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे येण्यास निघाले. भांबेरी येथे पोहचले. रात्रभर थांबून सकाळी ते निघणार होते. परंतु सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. या सर्व घडामोडींवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु न बोलताही त्यांनी आपला संदेश दिला. त्यांनी एकाच दगडात दोन पक्ष्यांना लक्ष केले. भुजबळ म्हणाले की, सध्या अधिवेशन आहे. मला आता तिकडे बघू द्या. जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. परंतु मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही नाटके आहेत. त्यातील एक नाटक म्हणजे गृह खात्याला जाग येते अन् दुसर नाटक म्हणजे सीमेवरून परत जा… या दोन्ही नाटकांची जुळवाजुळव करत आहे.
भुजबळ यांचा टोला कोणाला
भुजबळ यांनी ज्या दोन नाटकांची नावे सांगितले त्यावरुन भुजबळ यांचा टोला कोणाला आहे, त्याची चर्चा रंगली आहे. जरांगे यांनी रविवारी ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यानंतर गृहखाते आक्रमक झालेले दिसत आहेत. यामुळे गृह खात्याला जाग येते, असे म्हणत भुजबळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसेच मनोज जरांगे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याकडे तावातावने निघाले होते.
समाज बांधवांनी समजवून ते ऐकण्यास तयार नव्हते. रविवारी रात्री त्यांनी भांबेरी येथे मुक्कम केला. त्यानंतर सकाळी दहा, अकरा वाजता आपण मुंबईला जाणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. परंतु सकाळी अचानक मनोज जरांगे बॅकफूटवर आले. त्यांनी भांबेरीवरुन अंतरवाली सराटीत परत जाण्याचा निर्णय घेतला. तो संदर्भ देत भुजबळ यांनी सीमेवरुन परत जा, या नाटकाच्या उल्लेख केल्याची चर्चा रंगली आहे.