महेंद्र मुधोळकर, बीड | 2 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले आहे. मराठवाड्यातील आंदोलन अधिकच गंभीर बनले. त्यामुळे बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करावी लागली होती. मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाल्याच्या घटना घडली होती. मराठा आंदोलनासंदर्भात टीव्ही ९ मराठीने बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लोक प्रतिनिधींच्या घरी जाळपोळ झाली. त्यावेळी जमाव हा हिंसक झाला होता. जमावाकडून महिला अन् लहान मुलांना टार्गेट करण्यात आले होते, असा दावा केला. हल्ला करणारे तरुण हे 17 ते 22 वयोगटातील तरुण होते, असेही त्यांनी सांगितले.
बीडमध्ये हिंसाचार घडला हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोक प्रतिनिधींच्या घरी जाळपोळ झाली. जमाव हा हिंसक झाला होता. जमावाकडून महिला लहान मुलांना टार्गेट करण्यात आले होते. जीव मारण्याचा आंदोलकांचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात संपूर्ण बीड जिल्ह्यात 300 जणांची चौकशी केली आहे. आतापर्यंत 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होईल, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
आंदोलन करणारे तरुण हे 17 ते 22 वयोगटातील आहेत. यातील काही तरुण हिंसक झाले होते. अनेक तरुण राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यांच्या अटकेनंतर चौकशी सुरु झाली आहे. त्यातून अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. लोक समोर येवून आम्हाला आरोपीची माहिती देत आहेत. तसेच आम्ही आणखीन सीसीटीव्ही तपासात आहोत. जाळपोळ घटना घडविणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. तसेच कोणत्याही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही. ज्यांनी हिंसक घटना घडविली त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. ज्यांनी कट रचला आणि सहभाग घेतला, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, असे नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.
मराठा आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 44 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. आंदोलकांनी बसेला टार्गेट केले आहे. त्यामुळे आम्ही बसेस लवकर सुरू करणार नाहीत. संपूर्ण वातावरण शांत झाल्यावर बसेस आणि इतर सेवा सुरू करणार आहोत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.