Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, आंदोलन संपणार ?
manoj jarange patil and Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पोहचण्यापूर्वीच त्यांचे आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
दत्ता कानवटे, नवी मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. नवी मुंबईतून मुंबईत पोहचण्यापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता शासकीय विहित नियमानुसार अंमलबजावणी होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
काय म्हणाले दीपक केसरकर
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आता शासकीय विहित नियम असतात, त्यानुसार त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे घडले की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता आणखी ही 50 लाखांच्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार
मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार होते. मुंबई ठप्प होणे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन यंत्रणा कामाला लावली. आता मनोज जरांगे यांनीही मान ठेवला पाहिजे. त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना भेटून आनंद साजरा करतील.
मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघाले होते. मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरु करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. आता आरक्षणाचा गुलाल घेऊनच मुंबई सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या चार, पाच दिवसांपासून सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत होते. परंतु त्या चर्चेतून तोडगा निघत नव्हता. अखेर मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ते मुंबईत आझाद मैदानाकडे येणार होते. त्यापूर्वी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेला यश आले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.