फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल
धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. केवळ एका बोलघेवड्या मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले आहे, असा हल्लाबोल बुधवारी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला.
नाशिकः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. नवाब मलिक मुस्लीम आरक्षणावर बोलत नाहीत. केवळ एका बोलघेवड्या मंत्र्यामुळे ओबीसी आरक्षण गेले, असा हल्लाबोल बुधवारी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. राज्यातले महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचे आणि अपशकुनी आहे. हे सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहित नाही. मात्र, यामुळे लोक देशोधडीला लागले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
विमा कंपन्यांसोबत साटेलोटे
विनायक मेटे म्हणाले की, दोन वर्षांतील आघाडी सरकारने केलेली कामे कोणालाही सांगता येणार नाहीत. कोरोना काळात सरकारमुळे लोक देशोधडीला लागले ही यांची उपलब्धी आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार कोणत्या मुहूर्तावर आले माहिती नाही. मात्र, सरकार आल्यापासून राज्यात संकट आहे. हे पालथ्या पायाचे अपशकुनी सरकार असल्याने ही वेळ आली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकार केले आहे. कर्जमुक्ती करू असे सांगितले. मात्र, असे काही झाले नाही. सरकार आणि विमा कंपन्यांचे साटलोटे आहे. शेतकऱ्यांचा मात्र तोटा होत आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
शिवरायांच्या नावाने राजकारण
मेटे म्हणाले की, आघाडी सरकार नितीन राऊत यांच्या माध्यमातून लोकांची वीज तोडत आहे. शब्द पाळायचा नाही, विश्वासघात करायचा, हा या सरकारचा स्थायीभाव आहे. सरकारला सामाजिक दृष्ट्या पाठिंबा नाही. कोणत्याही समाजाचा सरकारला पाठिंबा नाही, असा दावा त्यांनी केला. फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण या सरकारने घालवले. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात. मात्र, महाराजांच्या स्मारकासाठी यांनी दोन मिनिटे देखील दिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाणांच्या तोंडाला कुलूप
मेटे यांनी यावेळी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांनी देखील तोंडाला कुलूप लावले आहे. अण्णा साहेब महामंडळाचा कारभार ठप्प आहे. मुस्लीम आरक्षणाबद्दल नवाब मलिक चकार शब्द काढत नाहीत. मुस्लीम मूल मोठे व्हावेत याचे त्यांना काही पडले नाही. फक्त आपला जावई आणि मुलगी कसा सुरक्षित राहील याच्याशी त्यांना देणे-घेणे आहे. नवाब मलिक, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे घर हाच त्यांचा मुस्लीम समाज आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. धनगर समाजाला वाऱ्यावर सोडून देण्याचे काम केले. आता सुप्रिया सुळे का बोलत नाहीत. या सरकारमधील बोलघेवड्या मंत्र्यांमुळे ओबीसी आरक्षण गेले, असा दावाही त्यांनी केला.
इतर बातम्याः
साहित्य संमेलनात राजकीय कलगीतुरा; महापौरांचा बहिष्कार, भाजप नेत्यांची नावे नसल्याने नाराज