मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीस यांच्यावर घणाघात, बंद दाराआड काय झाले ते दोन-तीन दिवसांतच….
Manoj Jarange devendra fadnavis arvind darker: दरेकर यांच्या अभियानात कुणीही सहभागी होऊ नका. हे सगळे लोक फडणवीस यांचे ऐकून मराठयांचे आंदोलन चिघळण्यासाठी तिथे जात आहे. दरेकर, फडणवीस यांच्यासाठी समाजाचा रोष तुम्हाला सहन करावा लागत आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी घणाघाती हल्ले केले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत असंसदीय शब्दांचा वापर केला. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत. आता फक्त दोन-तीन दिवस थांबा, सर्व उघड करतो. आपल्याकडे बरीच माहिती आली आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी म्हटले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
मराठ्यांची यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांनी काही दुखी आत्म्यांना सोबत घेतले आहे. ते अडचणीत आले आहेत. काय करावे हे त्यांना सुचत नाही. आमचे लोक गोळा करून फडणवीस आम्हाला संपण्याचे प्रयत्न करत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन हे फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय होत नाही. या वेळेस सरकारने नवीन डाव खेळला आहे. मराठा आंदोलकांना पुढे करायचे आणि मागे ओबीसी उभे करून मराठ्यांचा आंदोलन चिघळले असे दाखवून मराठा बदनाम करायचा, असे त्यांचे षडयंत्र आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. एका क्रांती मोर्चाचे तीन क्रांती मोर्च करणारे दरेकर आहेत. तुमच्या खांद्यावर फडणवीस आणि दरेकर बंदूक ठेवत आहेत. तुम्हाला त्यांच्या दरात जाण्याची गरज काय, त्यांना तुमच्या दरात येऊ द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
१३ संघटना जमा केल्या
फडणवीस यांच्या सांगण्यावरुन प्रवीण दरेकर यांनी १३ संघटना जमा केल्या आहेत. त्या लोकांची बैठका कुठे झाल्या? बैठकीत कोण होते? डोंबिवली आणि मलाबर हीलमधील बैठकीत काय झाले? ही सर्व माहिती दोन, तीन दिवसांत माझ्याकडे येणार आहे. मग आपण या सर्व गोष्टी उघड करणार आहोत. फडणवीस तुम्हालाही शॉक बसेल की आपली माहिती मनोज जरांगे यांच्याकडे कशी जात आहे. परंतु या सर्व गोष्टीवरुन पडदा लवकरच उठणार आहे.
दरेकर यांच्या अभियानात सहभागी होऊ नका
दरेकर यांच्या अभियानात कुणीही सहभागी होऊ नका. हे सगळे लोक फडणवीस यांचे ऐकून मराठयांचे आंदोलन चिघळण्यासाठी तिथे जात आहे. दरेकर, फडणवीस यांच्यासाठी समाजाचा रोष तुम्हाला सहन करावा लागत आहे. आंदोलकांच्या पाठीशी कोणाला उभे करायचे त्याची चर्चा त्या बैठकीत झाली होती. आपण आणखी काही लोकांना उघडे पडणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.