Manoj jarange Patil | ‘मी पाणी प्यायला लागलो आणि….’, ‘त्या’ प्रश्नावर मनोज जरांगे यांचं थेट उत्तर
Manoj jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील आजच्या पत्रकार परिषदेत थोडे तरतरीत वाटले. कारण त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केलीय. पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय चर्चा झाली? त्या बद्दल सुद्धा सांगितलं.
जालना : राज्याच्या काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दोन आमदारांची घर पेटवण्यात आली. बसेस जाळण्यात आल्या. राजकीय नेत्यांची कार्यालय फोडण्यात आली. यावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. ‘मी पाणी प्यायला लागल्यानंतर मराठा समाज शांत झाला’ असं उत्तर त्यांनी दिलं. “मराठा समाजाने सांगितलं, आरक्षणाला दोन दिवस उशिर झाला तरी चालेल, पण आम्हाला तुमची गरज आहे. त्यांच्या सांगण्यानुसार मी पाणी प्यायला सुरुवात केली. जाहीरपणे पाणी पितोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मी पाणी पिल्यानंतर मराठा समाज शांत होणार आणि माझ्या मतानुसार मराठा समाज शांत झालाय. पुन्हा उद्रेक करु नका, शांत व्हा” असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं.
“क्षत्रिय मराठ्याने लढायच असतं, आत्महत्या करुन मरायच नसतं. मी सुद्धा लढतोय. मी मरणाला भीत नाही. पाण्यात ताकत आहे. पाणी प्यायला लागल्यापासून मी उठून बसलोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाज दिलेल्या शब्दाला जागला. सगळीकडे शांततेत आंदोलन सुरु आहे. पहिलं साखळी उपोषण नंतर आमरण उपोषण. आमरण उपोषण जमेल तसं करा. पण साखळी उपोषण सोडू नका. आपण राजकीय नेत्यांच्या दारात जायच नाही आणि त्यांना गावात येऊ द्यायचं नाही यावर ठाम आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांशी मनोज जरांगेंची काय चर्चा झाली?
मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावर ते म्हणाले की, “मी पाणी प्यायला लागलो आणि मराठे थंड झाले. तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका असं मी सांगितलं. मराठवाड्यातले भाऊ तुमचे, महाराष्ट्रातले तुमचे नाहीत का?. मराठवाड्यातले माझे, पश्चिम महाराष्ट्रातले माझे नाहीत का? अर्धवट नको, सरसकट आरक्षण द्या. विदर्भातून निजामकालीन पुरावे घ्या, महाराष्ट्राला आरक्षण द्या यावर मी ठाम आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.