Maratha Reservation | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक, काय ठरलं?
Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र होत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच चित्र आहे. राज्यात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दोन आमदारांची घर पेटवण्यात आली. बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांसोबत महत्त्वाची बैठक केली.
मुंबई (गिरीश गायकवाड) : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. जालन्यात अंतरवाली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावलीय. काल स्टेजवर उभ राहतानाच मनोज जरांगे पाटील कोसळले. एकाबाजूला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाच दुसऱ्याबाजूला राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच चित्र आहे. खासकरुन मराठवाड्यात बीड जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या. काल हिंसक झालेल्या जमावाने दोन आमदारांची घर जाळली. काही राजकीय पक्षांची कार्यालय फोडण्यात आली. रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. काही ठिकाणी बसेस पेटवण्यात आल्या. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता राज्य सरकार अलर्ट मोडवर आलं असून बीड येथे एक कंपनी पाठवण्यात आली. एसआरपीएफची 1 सोलापूर युनिटची कंपनी बीडसाठी रवाना तर 3 जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 कंपन्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यात काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिक्षक यांची दृश्यप्रणाली द्वारे बैठक झाली. त्यात काही महत्त्वाचे निर्णय झाले. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून काही समाजकंटक हिंसक घटनांना खत पाणी घालत असल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला. राज्यात आंदोलनाच्या आडून अराजकता पसरवत दुकानांची लूट केल्याच्याही घटना काही ठिकाणी घडल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिलं.
पोलिसांना काय सूचना?
अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या गृहविभागाकडून सूचना देण्यात आल्या. खासगी व सरकारी संपत्तींचे नुकसान करुन आंदोलन चिघळवणाऱ्या व्यक्तींवरही कारवाईच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकाऊंटवर सायबर पोलिसांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर असतील.