‘तीन टप्प्यांमध्ये करेक्ट कार्यक्रम…’, मनोज जरांगेंनी सांगितला विधानसभेचा संपूर्ण प्लॅन
मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी निवडणुकीचं नियोजन नेमकं कसं असणार याबाबत माहिती दिली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे उमेदवार उभे करायचे आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे, तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल त्याला पाठिंबा द्यायचा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीत मांडली. दरम्यान त्यांनी आता विधानसभेचं नियोजन नेमकं कसं असणार याचे तीन टप्पे सांगितले आहेत.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आपले तीन टप्पे आहेत. एक जिथे उमेदवार निवडून येतील आपण तिथेच उमेदवार देणार आहोत. दोन एस.सी, एस.टी मतदार संघामध्ये जे आपल्या विचाराचे लोक आहेत, जे आपल्या मागणीशी सहमत आहेत, त्या मतदान संघातील मराठा समाजाची मतं त्यांना दिली जाणार आहेत, मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो,आणि त्याला निवडून आणले जाणार आहे. राखीव मतदार संघात दोन्ही आले नाही तर, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार दिला जाईल. आणि त्याला मराठा, मुस्लिम आणि दलितांचे बळ दिले जाणार आहे. त्याला निवडून आणत त्या दोघांना पाडणार आहोत. तीसरा टप्पा ज्या ठिकाणी आमचा उमेदवार नाही अशा ठिकाणी आम्ही आधी त्या उमेदवाराकडून आमच्या मताशी सहमत असल्याचं लिहून घेणार आहोत, आणि मगच त्याला मराठा समाज मतदान करणार आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही फक्त अर्ज भरू नका, आपल्याला समाजाची ताकत दाखवायची आहे. बॉण्ड आम्हाला डायरेक्ट आणून देऊ नका तर त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा. सगळी समीकरण बघावी लागणार आहे, समीकरणाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जिथे एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले असतील तिथे ऐनवेळी फक्त एक उमेदवार दिला जाईल बाकीच्यांनी आपले अर्ज काढून घ्यायचे आहेत. जो आपली उमेदवारी मागे घेणार नाही तो मॅनेज झाला असं आम्ही समजू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.