अंतरवालीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘आमचा एक मेंबर इच्छुक आहे म्हणून मध्ये जाऊन पाटलाचा गेम करणार आहे, लक्ष देऊन बघ सगळे आता दहा मिनिटात पाटलाचा कार्यक्रम’ असा धमकीचा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील हे जिथे उमेदवारांच्या मुलाखतीत घेतात, तिथे पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच गेटवर सर्वांची कडक तपासणी करूनच त्यांना आत सोडलं जात होतं. कागदाशिवाय इतर वस्तू मुलाखतीच्या ठिकाणी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जरांगे पाटील यांना धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करायचे आणि जिथे आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे तीथे आपल्या मागण्यांना जो उमेदवार पाठिंबा देईल त्याला पाठिंबा द्यायाचा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांना ही धमकी आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.