manoj jarange patil on vidhan sabha election: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर समाजाचे स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत मनोज जरांगे म्हणाले, समाज हा राजकारण करण्यासाठी एक आला नव्हता, आम्ही समाज म्हणून एकत्र आलो होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नाईलाजाने या मार्गावर आणले आहे. आपल्याला जो संपवायला निघाले आहेत, त्यांना संपवणे गरजेचे आहे. समाजातील सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक यांनी सर्वांनी असेच मत मांडले आहे. परंतु आजच्या बैठकीत काहीच निर्णय झाला नाही. आता रविवारी समाजाची बैठक होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वैचारिक मंथनाला सुरुवात झाली. शनिवारी झालेल्या बैठकीत काही निर्णय झाला नाही. आपण उमेदवार उभे केले पाहिजे का? आरक्षणाला विरोध करणारे उमेदवार पाडले पाहिजे का? यावर चर्चा झाली. आता उद्या राज्यातील समाज एकत्र येत आहे. त्या समाजाशी चर्चा करणार आहे. सुमारे सात ते आठ तास समाजासोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
रविवारी समाजाच्या होणाऱ्या बैठकीतील निर्णय हा निर्णायक आहे. हा निर्णय घेताना कोणतीही घाई गडबड नको. कारण निर्णय चुकायला नको. या निर्णयामुळे समाज अडचणीत येईल, असे काही होता कामा नये. ज्यांनी आपल्याला संपवले त्यांना संपवण्यात देखील विजय असतो. ज्यांनी समाज संपवायचा विडा उचलला आहे त्यांनाच संपवले पाहिजे. उमेदवार उभे करुन विजय मिळेल, असे काही नाही. परंतु आपल्या समाजविषयी एखादा द्वेष करत असेल तर त्याला हरवणे सुद्धा विजय असतो. आजच्या बैठकीत सर्व तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक या सर्वांचे मत एकच होते, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
स्वबळावर लढणार की युती करणार हे उद्या ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत सहाचे सहा पक्ष सत्तेत बसले. परंतु कोणीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. देवेंद्र फडणीस यांनी आमच्या समाजाची खूप हेळसांड केली आहे. एवढी हेळसांड आतापर्यंत कोणीच केली नसेल, असा हल्ला जरांगे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.