बाबांना दिलेलं वचन नेहमी पाळलं, तंबाखूचं कधीच प्रमोशन केलं नाही – स्माइल ॲंबॅसेडर सचिन तेंडुलकरचे वक्तव्य
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ' स्वच्छ मुख अभियाना'चा 'स्माइल ॲंबॅसेडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : मी जेव्हा भारतासाठी खेळायला लागलो, तेव्हा माझ्या बाबांी (रमेश तेंडुलकर) माझ्याकडे एक वचन मागितले होते. तू कधीच तंबाखूचे प्रमोशन अथवा जाहिरात करणार नाहीस, असे मला वचन दे. ते वचन मी आजतागायत पाळले, असे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) सांगितले. राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चा ‘स्माइल ॲंबॅसेडर’ (smile ambadssador) म्हणून सचिनची नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास सचिनने सहमती दर्शवली असून आज त्याच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
मी देशासाठी खेळायला लागल्यावर माझ्याकडे बऱ्याच ऑफर्स आल्या, (तंबाखूच्या) अनेक कंपन्यांनी मला भरपूर पैसे ऑफर केले, पण मी कधीच त्यांची ऑफर स्वीकारली नाही. माझ्या बॅटवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कंपनीचा लोगो असायचा, पण दोन वर्ष बॅटवर कोणताही लोगो नव्हता. कारण तेव्हा मला तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती, त्यांच्या स्टीकर बॅटवर लावण्यासाठी मला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले, पण मी ते कधीच स्वीकारले नाही. आज बाबा वरून पाहत असतील तर ( ‘स्माइल ॲंबॅसेडर’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे) आज खूप खुश असतील, अशा शब्दांत सचिनने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
ओरल हेल्थ ऐरणीचा विषय
मौखिक आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. आज आपल्याला मुखाचे जे रोग आहेत, त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ओरल हेल्थ हा ऐरणीचा विषय आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ओरल कॅन्सरचीही अनेक प्रकरणे दिसून येतात. तंबाखू आणि मावा खाणारे अनेक लोक दिसतात. ते खाऊ नये यासाठी जागृती करणे महत्वाचे. सचिन तेंडुलकरसारखा मोठा सेलिब्रिटी जेव्हा याबद्दल जनजागृती करतो, त्याचा प्रचंड मोठा परिणाम तरूणाईवर होतो. त्यामुळे ते या मोहिमेसाठी अतिशय योग्य ॲंबॅसेडर ठरतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सचिन तेंडुलकरने या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची व्याप्ती सर्वदूर पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.