मोठी बातमी ! आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील; अतुल सावे यांचा थेट इशारा
पाच वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदाराला दिला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, पाच वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत, त्यामुळे ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही ते बाहेर पडतील असा थेट इशारा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्या आमदाराला दिला आहे. हदगाव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी तांडावस्तीच्या निधीवाटपावरून पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती, यावरून अतुल सावे यांनी थेट इशारा दिला आहे.
हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी अतुल सावे यांना पत्र लिहून तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी विरोधकांना वाटप केल्याची तक्रार केली होती. तसेच नांदेडमध्ये आल्यानंतर निषेध व्यक्त करू, असा इशारा दिला होता. यावर नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर अतुल सावेंनी आमदार बाबुराव कदम यांना थेट इशारा दिला असून आमच्याकडे पाच वर्षे 237 आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता अतुल सावे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रस्ताव कलेक्टर पाठवतात, आम्ही त्यांना मंजुरी देतो, त्यामुळे आमदारांनी ते प्रस्ताव चेक करावेत असंही अतुल सावे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान तांडा वस्तीचा निधी हा आमच्या खात्याच्या अंतर्गत दिला जातो, याचे सगळे प्रस्ताव असतात ते कलेक्टरच्या माध्यमातून मंजूर करून पाठवले जातात. त्याच्यानंतर आम्ही उपलब्ध करून देतो. हा प्रस्ताव आम्ही तयार करत नाही, हा प्रस्ताव कलेक्टरकडून येतो. त्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करू दिला, आम्ही निधी उपलब्ध करून दिला नाही, असा आमदारांमध्ये गैरसमज निर्माण होतो, असंही यावेळी अतुल सावे यांनी म्हटलं आहे.
डीपीडीसीची बैठकीपूर्वी या शहराचे काय विषय आहेत त्यावर चर्चा करण गरजेचं होतं. महत्त्वाचा विषय असा होता की महापालिकेचे काही विषय प्रलंबित होते. शिक्षण, आरोग्य, पोलीस विभाग व पाणीटंचाई याबाबत आढावा घेतला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधिंना देखील सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांच्या भागातील जे काही महत्त्वाचे विषय असतील त्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.